लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सध्या कृत्रिम ऑक्सिजनचे दर वधारले आहेत. गेल्या तीन महिन्यात यात ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. आधीच या कोरोनाच्या संकटात कृत्रिम ऑक्सिजनच रुग्णांचा जीव वाचवत आहे. त्याचेही दर आता वधारले आहे. सुमारे तीन महिने आधी एक क्युबिक मीटर ऑक्सिजन वायुचा दर हा २५ रुपये होता आता हाच दर जवळपास ६० रुपयांवर गेला आहे. लिक्विड ऑक्सिजनचे दर देखील १२ रुपयांवरून ४० रुपयांवर गेल्याने ही दर वाढ झाली आहे.
जळगाव शहरात सध्या जामनगर, राऊरकेला, भिलाई येथून लिक्वीड ऑक्सिजन येत आहे. जवळपास एक ते दीड हजार किमीचे अंतर पार करून शहरात लिक्विड ऑक्सिजन येतो. लिक्वीड ऑक्सिजन हा टनामध्ये त्याचे वायुत रुपांतर करून क्युबिक मीटरमध्ये विकला जातो.
सध्या शहरात दररोज ४५ ते ५० मेट्रीक टन ऑक्सिजन लागत आहेत. लिक्विड ऑक्सिजनचे रुपांतर जळगाव शहरातील प्लांटमध्ये पुन्हा ऑक्सिजन वायुत रुपांतर केले जाते. त्यानंतर हा वायु रुग्णांना दिला जातो. शहरातील दोन डिलर आणि भुसावळचा एक डिलर जिल्हाभरात पोहचवतात. सर्व रुग्णालयांमध्ये त्यांच्याकडून ऑक्सिजन दिला जातो.
का वाढले ऑक्सिजनचे दर
ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुरवठा देखील वाढत आहे. हे दर वाढीचे एक महत्त्वाचे कारण असले तरी द्रव ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपन्यांचे अंतर हे जळगाव पासून किमान एक हजार ते दीड हजार किमीचे आहे. ऑक्सिजन टँकर हे सलग ३६ ते ४० तास प्रवास करून जळगावला येत आहेत. इंधनाचे दर वाढल्याने वाहतुक खर्च देखील वाढला आहे. या सर्वांचा परिणाम ऑक्सिजनच्या दरांवर झाला असल्याची माहिती शहरातील एका ऑक्सिजन पुरवठा दाराने दिली.
वायु ऑक्सिजनचे दर
जानेवारी २५ रुपये प्रति क्युबिक मीटर
एप्रिल ६० रुपये प्रति क्युबिक मीटर
द्रव ऑक्सिजनचे दर
जानेवारी १२ रुपये प्रति क्युबिक मीटर
एप्रिल ४० रुपये प्रति क्युबिक मीटर