लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही मंगल कार्यालय, सभागृह, लॉन्समध्ये होणाऱ्या लग्न समारंभांमधील गर्दीवर अजूनही अंकुश आलेले दिसून येत नाही. रविवारी शहरातील १० मंगल कार्यालये सील केल्यानंतर सोमवारीदेखील मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. सोमवारी भाजपचे गटनेते भगत बालाणी यांच्या मालकीचे असलेल्या बालाणी लॉनसह, शानभाग सभागृह, आर्यन रिसोर्ट व रॉयल पॅलेसचे सभागृह देखील सील करण्यात आले आहे.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता एमआयडीसी भागातील भाजप गटनेते भगत बालाणी यांच्या मालकीचे बालाणी लॉन व रिसॉर्ट सील केले. त्यानंतर डॉ. रवी महाजन यांच्या मालकीचे आर्यन रिसॉर्ट व पार्क देखील महापालिकेच्या पथकाकडून सील करण्यात आले. यासह प्रभात चौकातील शानबाग सभागृहातदेखील एका कार्यक्रमादरम्यान मोठी गर्दी आढळून आली. महापालिकेच्या पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर मनपाच्या पथकाने धाड टाकून हे सभागृह देखील सील केले आहे. तर हॉटेल रॉयल पॅलेसच्या तळमजल्यावरील सभागृहदेखील सील करण्यात आले आहे.
५० हजार ते १ लाख रुपयांचा करणार दंड
मनपा प्रशासनाने आता नियमांचा भंग करणाऱ्या मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन्सच्या मालकांवर कायदेशीर कारवाईसोबतच दंडाच्या रकमेतदेखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉन्स व मंगल कार्यालय सील केल्यानंतर मनपाकडून ५० हजार ते १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. नागरिकांची असलेली गर्दी पाहता दंडाची रक्कम देखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनीच केला नियमांचा भंग
मनपा आरोग्य अधिकारी विकास पाटील यांच्या मुलीचे लग्न रविवारी आर्यन रिसॉर्ट येथे होते. या लग्नसमारंभातदेखील सुमारे ३०० ते ४०० वऱ्हाडींनी हजेरी लावली. या कार्यक्रमात अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांनीदेखील हजेरी लावली होती. प्रशासनाकडून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात असताना, प्रशासनातील अधिकाऱ्यांकडूनच जर अशा प्रकारे नियमांकडे दुर्लक्ष केले जात असेल तर यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. यामुळे मनपा आयुक्त, उपायुक्तांसह मनपातील अनेक अधिकाऱ्यांनी या लग्नसोहळ्यात जाणे टाळले.
मू.जे. महाविद्यालय प्रशासनाला समज
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी मू.जे. महाविद्यालयातही पाहणी केली. महाविद्यालयातील सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांनी मास्क न लावल्याचे आढळून आले. तसेच अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे घोळके दिसून आले. यासह सॅनिटायझरचीदेखील व्यवस्था प्रवेशव्दारावर नसल्याने उपायुक्तांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्यांची भेट घेतली. तसेच विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर हेच चित्र पहायला मिळाल्यास कारवाईचा इशारा देखील उपायुक्तांनी मू.जे. महाविद्यालय प्रशासनाला दिला आहे.