जळगाव - वेगवेगळ्या जिल्ह्यासह राज्यातून दुचाकी चोरून त्याची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करून चार जणांना अटक केली होती. यामधील मुख्य सूत्रधार संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले ( वय, २९, रा.पांगरी कुटे ता.मालेगाव जि.वाशिम) याला देखील अटक करण्यात पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहे.
गेल्याच आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यासह गुजरात राज्यातून दुचाकी चोरी करून त्याची जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यात चार संशयित आरोपींना ३० ऑगस्ट रोजी चोरीच्या १६ दुचाकींसह अटक केली होती. यातील मुख्य सूत्रधार संतोष उर्फ शेरा गजानन इंगोले हा फरार होता.
दुचाकी विक्री करायला आला, अन् पोलीसांच्या हाती लागलाबुधवारी मुख्य सूत्रधार संशयित आरोपी संतोष इंगोले हा जळगाव शहरात दुचाकी विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, संदीप सावळे, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, प्रीतम पाटील, भगवान पाटील, हेमंत पाटील, कृष्णा देशमुख, ईश्वर पाटील, सचिन महाजन, लोकेश माळी, महेंद्र सूर्यवंशी, प्रमोद ठाकूर यांनी कारवाई करत संतोष इंगोलेला अजिंठा चौकातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख २० हजार किंमतीच्या चोरीच्या ८ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.