जळगाव : आपली कामे व्हावीत म्हणून जळगावकरांना गल्लीबोळात आंदोलने करावी लागतात. यात नवीन काही राहिलेले नाही पण केलेल्या आंदोलनांचा उलटाच परिणाम झाल्याचा धक्कादायक अनुभव मेहरुणमधील रहिवाशांना आला. रस्त्याचे काम होत नाही म्हणून आंदोलन केले तर मक्तेदाराने कामासाठी आणलेले मटेरियलच उलचून नेले.
जळगावमध्ये अमृत योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी मेहरुणमध्ये केजीएन डेअरी परिसरातील तीन रस्त्यांवर खोल चारी खोदण्यात आली होती. काम झाल्यावर मक्तेदाराने डांबरीकरण वा काँक्रिटीकरण करून देण्याची अट निविदेत आहे. त्यानुसार मक्तेदाराने दोन रस्त्यांचे काम केले पण तिसऱ्याचे काम दोन महिन्यांपासून बाकी होते. खडी आणली होती. आज-उद्या करत काम लांबत चालले होते. रहिवाशांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी गल्लीमध्ये मक्तेदाराच्या विरोधात घोषणाबाजी केली. याचा परिणाम उलटाच झाला. मक्तेदाराने सोमवारी, सकाळी ट्रॅक्टर आणला आणि रस्त्याच्या कामासाठी आणलेली खडी उचलून नेली आणि परत जाताना खड्ड्यांमध्ये माती भरून गेले, अशी माहिती सलीम इनामदार यांनी दिली.
तकलादू कामाची तक्रार..
काँक्रिटीकरण झालेल्या ठिकाणी वाळू बाहेर येत आहे. या प्रकाराविषयी रहिवासी नाराजी व्यक्त करत आहे. रमजान महिना सुरू असताना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेने दखल घेतली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.