चोपडा : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी विविध मागण्यांसाठी ८ सप्टेंबरला आंदोलन करणार आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक यांना महाराष्ट्र सरकारने १ जुलै २०२० पासून, तर शासन निर्णयानुसार एप्रिल २०२१ पासून दरमहा दोन हजार रुपये आशांसाठी व गटप्रवर्तक त्यांच्यासाठी तीन हजार रुपयांची वाढ दिलेली नाही व ती दरमहा नियमित पगारात लागू केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. तरी ही वाढ एकत्रित मानधनाबरोबर द्यावी या व इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे जिल्हा परिषदेवर ८ सप्टेंबरला दुपारी बाराला धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आली.
इतर मागण्या अशा
८ मार्चपासून कोविड लसीकरण होत आहे. परंतु, मानधन देण्यात आलेले नाही, ते अदा करावेत.
आरोग्यवर्धिनी कामाचे मानधन मिळावे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’च्या दुसऱ्या राऊंडचा मोबदला मिळावा. मोबाईल रिचार्ज वाढीव दराने मिळावे. १०० रिचार्ज दर परवडत नाही. साध्या फोनला १५० व व्हाॅट्सॲप मोबाईलला २५० रिचार्ज लागतो. १ जुलै २०१९ पासून जाहीर केलेली मानधनवाढ आशावर्कर दीड हजार रुपये व मदतनीस गटप्रवर्तक दोन हजार रुपये फरकासह अदा करण्यात यावी.
मानव विकास कार्यक्रमात आशांना दिवसभर थांबूनही मोबदला मिळत नाही, तो मिळावा. मासिक बैठकांप्रमाणे मोबदला मिळावा. बैठक अहवालात नवीन कामांचे कोरम नाहीत. तो अहवाल फॉर्म दुरस्त करून मिळावा. आशा व गटप्रवर्तक महिलांच्या परिवारातील सर्व कुटुंबाला शासनाने कोरोना विमा कवच द्यावे.
संघटनेचे अध्यक्ष अमृत महाजन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लेखा अधीक्षक दीपक भावा व उपअधीक्षक यांना दिले. यावेळी तालुकाध्यक्षा मीनाक्षी सोनवणे, वंदना पाटील, सुरेखा कोळी, छाया पाटील, प्रतिज्ञा पाटील, ज्योत्स्ना खंबायत, तडवी, रेखा पाटील, रत्ना शिरसाट, उज्ज्वला पाटील, शालिनी पाटील या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.