चोपडा : शासनाने मानधनवाढीचा अध्यादेश जाहीर केल्याचा आनंद तालुक्यातील सर्वच सातही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आशांनी एकमेकींना पेढे भरवून साजरा केला.आशा सेविका व गटप्रवर्तक संघटना (आयटक)तर्फे ९ ते १७ सप्टेंबर दरम्यान अमृतराव महाजन यांच्या नेतृत्त्वात ३ वेळा आंदोलन करण्यात आले होते. सरकारने मानधन वाढीचा जीआर काढावा म्हणून कामावर बहिष्कारही घातला होता. अखेर सरकारला १६ रोजी मानधनवाढीचा जीआर काढावा लागला. गटप्रवर्तकांसाठी अडीच हजार ते तीन हजार रूपये वाढ देण्यात येणार, असे आश्वासन दिले. या आनंदात आंदोलनार्थी आशा प्रतिनिधींनी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पार्पण करून व कार्यालयात एकमेकींना पेढे भरवून आनंद साजरा केला. तसेच कामावरील बहिष्कार मागे घेतला.त्याबरोबर तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ लासूरकर यांना गोरगावले, लासूर, धानोरा आरोग्य केंद्रातील आशांचे ५ महिन्यांचे थकित मोबदले व व्हिएचएनसीचे अनूदान मिळावे, जेएसवाय केसेसची आशा ५ ते ६ महिने काळजी घेते आणि ऐन वेळेस काही नर्सेस त्या महिलांना भूलथापा देऊन कूटूंब नियोजन केस हायजॅक करतात. हा प्रकार बंद करावा याबाबत लेखी नाराजी आशा प्रतिनिधींनी व्यक्त केली. निवेदनावर मीनाक्षी सोनवणे, वंदना पाटील, वंदना सोनार, शितल पाटील, आक्का पावरा, शालीनी पाटील, शरिफा तडवी, अलका पाटील, रत्ना शिरसाठ, मिना चौधरी, संगिता मराठे, मनिषा पाटील, शोभा पाटील, सरला बाविस्कर, उषा सोनवणे आदींच्या सह्या आहेत.