अमित महाबळ
जळगाव : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक गेली अनेक वर्षे आरोग्य सेवा घरोघरी पोहोचविण्यासह दरमहा सुमारे ८६ प्रकारची अनेकविध कामे दररोज करीत असतात. त्यापोटी त्यांना अत्यल्प मानधन मिळते मात्र, तेही मार्च २०२२ पासून अदा करण्यात आलेले नाही.
कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी काम केले. त्यांच्या कामाचे जागतिक आरोग्य संघटनेने देखील कौतुक केले. परंतु, राज्य शासनाने गरज संपताच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू केले आहे. मार्चपासून मानधन मिळाले नसल्यामुळे आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्यासमोर कुटुंबाचा चरितार्थ चालवावा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येकी ३५०० रुपये मानधन आणि इतर कामांचा मोबदला थकित आहे. जळगाव जिल्ह्यात २७०० आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आहेत.
या आहेत मागण्याआशा स्वयंसेविकांना थकीत मोबदला मिळावा, मुख्यालयाच्या आशाताईंना आरोग्यवर्धिनीचा मार्च २०२० पासून थकीत मोबदला अदा करावा, कुष्ठरोग आणि क्षयरोग कामाच्या सर्व्हेक्षणाचा मागील मोबदला देण्यात यावा, कोरोना कामाचा थकीत मोबदला आणि वाढीव मानधनाची थकीत रक्कम तातडीने द्यावी व ती दरमहा लागू करावी, जियो टॅगच्या फोटोची सक्ती बंद करावी.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना थकीत मोबदला गणपतीपूर्वी अदा करण्यात यावा. अन्यथा त्यांना काम बंद करण्यावाचून कोणताही पर्याय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली.