जळगाव : आफ्रिका खंडातील सर्वोच्च अशा किलोमांजोरो शिखरावर येत्या २६ जानेवारीला तिरंगा फडकविण्यासाठी जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या पथकात निवड झालेल्या बालाघाट येथील अनिल वसावे (ता. अक्कलकुवा) यांच्या स्वप्नांना जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या रूपाने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचा मदतीचा हात मिळाला. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अनिल वसावेची बातमी झळकली होती. तेव्हाच अशोक जैन यांनी या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरविले.
किलोमांजारोसारखे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर सर करण्याची संधी माझ्याकडे चालून आली. यासाठी अशोक जैन यांनी पुढाकार घेऊन सर्वतोपरी मदतीचा हात पुढे केला. फक्त आर्थिक पाठबळच नव्हे तर या मोहिमेसाठी लागत असणाऱ्या अनेक बाबींची पूर्ततादेखील करणार आहे. अशोक जैन यांच्यामुळे माझे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे अनिल वसावे यांनी सांगितले.
जैन स्पोर्टस् अकॅडमीतर्फे हिऱ्यांचा शोध - अशोक जैन
जैन अकॅडमीतर्फे चमकदार कामगिरी करणाऱ्या अशा हिऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी आवर्जून मदत दिली जाते. जागतिक पातळीवर विक्रम नोंदवू पाहणारे गिर्यारोहक अनिल वसावे यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही मदतीचा हात पुढे केला आहे, अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली.
.........................................
फोटो कॅप्शन - गिर्यारोहक अनिल वसावे यांच्या सोबत अशोक जैन