लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुसुंबा येथे मजुरांना सोडून परत नेरी जात असताना बांधकाम कंत्राटदार सुधीर व्यंकटेश्वर रवीपती (४०,रा.नेल्लुर वेदायपाडम, जि.नेल्लूर, आंध्र प्रदेश, ह.मु.नेरी) यांना एका जणाने रस्त्यात लिफ्ट मागितली आणि थोड्या अंतरावर चिंचोलीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चारचाकीच्या पुढे दुचाकी आडवी लावून मारहाण करून १६ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, अंगठ्या व रोख रक्कम असा १ लाख २ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी रात्री ११.४५ वाजता घडली. याप्रकरणी रविवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर व्यंकटेश्वर रवीपती यांनी औरंगाबाद महामार्गावरील सर्व पूल बांधकामाचा ठेका घेतला आहे. सध्या नेरी येथे त्यांचे वास्तव्य आहे. उमाळा गावाजवळील पुलाच्या बांधकामावर कुसुंबा येथील मजूर कामाला आहेत. शनिवारी रात्री ११ वाजता या मजुरांना सोडण्यासाठी रवीपती हे चारचाकीने (एम.पी.१०, सी.ए.४११७) गेले होते. मजुरांना सोडल्यानंतर एकटेच परत नेरी येथे जात असताना कुसुंबा गावानजीक एका जणाने त्यांना उमाळा फाट्यापर्यंत लिफ्ट मागितली, त्याला गाडीत बसविल्यावर चिंचोली गावाच्या पुढे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चारचाकीच्या पुढे दुचाकी आडवी लावली.
काय रे काय झालं म्हणत मारहाण
दुचाकीवरील दोघांनी रवीपती यांना काय रे काय झालं असे म्हटले अन् त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. मुझे क्यो मार रहे हो भाई असे रवीपती यांनी त्यांना विचारले असता गाडीत बसलेलादेखील त्यांच्यात मिसळला व गाडीतून बाहेर ओढून एकाने गळ्यातील ५६ हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओढली, तर दुसऱ्याने रस्त्यावरील लाकडी दांडा उचलून रवीपती यांच्या डोक्यात घातला. हातातील प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन्ही अंगठ्या, खिशातील १२०० रुपये रोख काढून घेतले.
फोन पे, गुगल पेचा लॉक खोलला
यावेळी तिघांनी मारहाण करून जबरदस्तीने मोबाइल हिसकावला. त्याचा पॅटर्न लॉक उघडायला लावल्यानंतर फोन पे व गुगल पेचा लॉकही उघडायला लावला. त्याचा पासवर्ड घेऊन ही चारचाकी चिंचोली पेट्रोलपंपाजवळ आणली. रवीपती यांना तेथे सोडून दुचाकीवरून तिघं जण जळगावच्या दिशेने पसार झाले. साधारण रात्री १२.३० पर्यंत हा थरार चालला. या घटनेनंतर रवीपती नेरी येथे गेले. रविवारी सकाळी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.