ममुराबाद : तालुक्यातील असोदा ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सुमारे ५० उमेदवार राहिले आहेत. तीन पॅनलमध्ये सरळ लढती होण्याची चिन्हे निर्माण झाली असताना पंचायत समितीचे सदस्य, जि.प. सदस्यांचे पती व माजी सरपंच स्वतः यावेळी मैदानात उतरले आहेत.
असोदा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी सरपंच विलास चौधरी यांच्या नेतृत्वाखालील लोकमान्य पॅनलचे १७, जिल्हा परिषद सदस्य पल्लवी पाटील यांचे पती रवि देशमुख यांच्या नेतृत्वाखालील संभाजी आबा पाटील ग्रामविकास पॅनलचे १२, तर पंचायत समिती सदस्य तुषार महाजन यांच्या नेतृत्वाखालील असोदा विकास पॅनलचे १७ जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे तिन्ही पॅनलप्रमुखांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करून यंदा शड्डू ठोकलेला आहे. त्यामुळे असोदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून, ग्रामस्थांमध्येही निकालाची उत्कंठा वाढली आहे.