बोदवड : तालुक्यातील येवती येथील माजी सरपंच तथा काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू पाटील यांच्यावर हल्ला करणारा मारेकरी हा त्यांचाच चुलत जावई असल्याची माहिती समोर येत आहे. या जावयासह त्याच्या मित्रास पोलिसांनी पोलीस कोठडीची हवा दाखवली आहे. गजानन प्रल्हाद मुंडे (वय ४०, रा.मंगलम नगर, शेगाव, जि.बुलढाणा) असे या जावयाचे नाव आहे.पुरुषोत्तम उर्फ बाळू पाटील यांच्यावर ७ रोजी संध्याकाळी बोदवड जामठी रस्त्यावर असलेल्या साई मंदिरात धारदार शस्त्राने गळ्यावर हातावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले होते. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. याबाबत बोदवड पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या तीन-चार तासातच पोलिसांनी आरोपींना बुलढाणा जिल्ह्यात ताब्यात घेतले. त्यात गजानन प्रल्हाद मुंडे याला पकडल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. गजानन मुंडे हा पुरुषोत्तम पाटील यांचा चुलत भाऊ रमेश पाटील यांचा जावई आहे. गजानन याचा गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. पती-पत्नीचा हा वाद आहे. गजाननची पत्नी माहेरी होती. पती-पत्नीच्या वादाच्या प्रकरणात पुरुषोत्तम पाटील हे मध्यस्थ होते. तेच आपल्या पत्नीला नांदण्यासाठी येऊ देत नाही, असा समज गजानन याचा झाला होता. त्यातून त्याने आपला मित्र सचिन मनोहर लांडे (वय ३४, रा.पारस, ता.बाळापूर, जि.अकोला) याच्या मदतीने ७ रोजी संध्याकाळी साई मंदिर परिसरात पुरुषोत्तम पाटील यांच्यावर चाकूने वार केला. नंतर एमएच २८-३४१७ या क्रमांकाच्या दुचाकीने मित्रासह फरार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात समय सुचकता दाखवत तीन-चार तासातच आरोपीला ताब्यात घेतले व त्याच्यावर कलम ३०७, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद केला. दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड हे करीत आहेत.
काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांच्या हल्ल्यातील मारेकरी निघाला जावई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 5:45 PM