जळगाव : मित्रांसोबत बसलेला असताना जुन्या वादातून हितेश संतोष शिंदे (२०,रा.चौघुले प्लॉट) या तरुणावर पाच जणांना लोखंडी सळई, पाईप व पट्टीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडे दहा वाजता कांचन नगरातील कालिंका माता मंदिर चौकात घडली. याप्रकरणात मनोज दत्तू चौधरी उर्फ काल्या, महेश गोविंदा चौधरी उर्फ बंटी, विजय किशोर पाटील उर्फ टमाट्या व दत्तू कडू चौधरी (सर्व रा.चौघुले प्लॉट) या चौघांना सोमवारी अटक करण्यात आली.
हितेश शिंदे हा महापालिकेत कंत्राटी कर्मचारी आहे. तीन महिन्यापूर्वी दीपक दत्तू चौधरी व हितेश यांच्यात मोबाईलवरुन बोलण्यात शिवीगाळ झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये वाद झाला होता, मात्र कुटुंबियांनी हा वाद मिटविला होता. रविवारी रात्री १०.३० वाजता हितेश हा मित्र प्रसाद चौधरी व रुपेश ठाकरे यांच्यासोबत कांचन नगरातील कालिंका माता चौकात गप्पा करीत असताना तेथे मनोज दत्तू चौधरी, महेश गोविंदा चौधरी, विजय किशोर पाटील असे तिघं दुचाकीवरुन आले. तिघं जण दीपक चौधरी याच्या टेन्ट हाऊसमध्ये गेले. महेश व मनोज यांनी तेथून लोखंडी पाईप आणून डोक्यात व पाठीत घातला. दीपक यानेही लोखंडी पट्टी मानेवर मारली. त्याचवेळी दत्तू चौधरी उर्फ लंगड्या हा देखील हातात तलवार घेऊन आला व जीवे मारण्याची धमकी दिली. अशोक शिंदे, विजय शिंदे व वडील संतोष शिंदे यांनी धाव घेऊन हितेशला त्यांच्या तावडीतून सोडविले. या प्रकरणी मनोज दत्तू चौधरी उर्फ काल्या, महेश गोविंदा चौधरी उर्फ बंटी, विजय किशोर पाटील उर्फ टमाट्या, दीपक चौधरी व दत्तू कडू चौधरी (सर्व रा.चौघुले प्लॉट) यांच्याविरुध्द सोमवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, दिनेशसिंग पाटील, मनोज इंद्रेकर, प्रशांत देशमुख, सलीम पिंजारी,राहूल घेटे व रवींद्र पाटील यांच्या पथकाने सोमवारी दीपक वगळता चौघांना अटक केली.