बिलांची रक्कम कमी होऊन होणार वसुलीला सुरुवात :
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर मनपाने लावलेला पाच पट दंडाचा निर्णय रद्द केल्यानंतर आता मनपाकडून गाळे भाड्यात मूल्यांकनाचे काम सुरू केले आहे. पाच पट दंड रद्द झाल्याने गाळेधारकांच्या थकीत भाड्याच्या रकमेत काही प्रमाणात घट होणार आहे. मनपा प्रशासनाकडून सध्या या बिलांची रक्कम कमी करण्याचे काम सुरू असल्याने मनपाकडून वसुली मोहिमेला काही प्रमाणात ‘ब्रेक’ लागला आहे; मात्र हे काम संपल्यानंतर मनपाकडून थकीत भाडे वसुलीच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गाळेधारकांकडे थकीत भाड्यापोटी एकूण ३०० ते ३२० कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यात पाच पट दंडाची रक्कम कमी झाल्यानंतर ५० कोटींची घट झाली आहे. मनपाने गाळेधारकांना दिलेल्या बिलांच्या रकमेत आता शासनाच्या निर्णयामुळे घट होणार आहे. मनपाकडून गाळेधारकांकडील थकीत भाड्याची वसुलीसाठी सोमवारपासून मोहीम सुरू करण्यात येणार होती; मात्र भाड्यातील बिलांच्या मूल्यांकनाच्या कामामुळे ही मोहीम आता काही दिवसांनंतर सुरू करण्यात येणार आहे. त्यात राज्य शासनाच्या ३० आमदारांची अंदाज समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे याबाबत महापालिकेत तयारी सुरू असल्याने महापालिकेने गाळे भाडे वसुलीला तूर्तास ब्रेक दिला आहे. मूल्यांकनाचे काम संपल्यानंतर पुढील आठवड्यात विशेष मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.