सुधारित आदेश : ग्रा. पं. निवडणुकीतील अडचणीनंतर निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्यापूर्वीच राष्ट्रीयीकृत बँकेत चालू किंवा बचत खाते उघडणे आधी बंधनकारक केले होते. मात्र, संबंधित बँकांकडून सहकार्य केले जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाने सुधारित आदेशान्वये उमेदवारांना आता सहकारी बँकेतही खाते उघडता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी सज्ज झालेल्या इच्छुक उमेदवारांची विविध प्रकारचे दाखले व घोषणापत्रे यांची जमवाजमव करताना आधीच खूपच धावपळ उडाली आहे. त्यात नामनिर्देशन पत्रासोबत खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने सबंधित उमेदवारांचा त्रास आणखी जास्त वाढला होता. ग्रामीण भागात आधीच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांची संख्या मर्यादित आहेत. त्यात जेवढ्या काही शाखा सध्या कार्यरत आहेत, त्यांच्या व्यवस्थापनाकडून उमेदवारांना तातडीने बँक खाते उघडून देण्यासाठी अजिबात सहकार्य केले जात नसल्याच्या तक्रारी होत्या. त्या आनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आधीच्या आदेशात बदल करून ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना राष्ट्रीयीकृत तसेच शेड्युल्ड बँकेसोबत सहकारी बँकेतही खाते उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यासंदर्भात माहिती देणाऱ्या आदेशाची प्रत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे. दरम्यान, बँक खाते उघडण्यात येणारी प्रमुख अडचण एकदाची दूर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.