लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : येथील अमर शहीद संत कंवरराम, संत बाबा हरदासराम, गोदडीवाला व बाबा गेलाराम यांच्या वर्सी महोत्सवात लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह भेट घेत संतांसोबत संवाद साधला. सिंधी समाजबांधवांकडून चालविल्या जाणाऱ्या सेवा व धार्मिक कार्याचा त्यांनी यावेळी बोलताना गाैरव केला. या वर्सी महोत्सवात सोमवारी सत्संग, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मंगळवारी महोत्सवाचा समारोप झाला.
संत कंवरराम नगर पूज्य सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वर्सी महोत्सवात डॉ. विजय दर्डा, सुरेशदादा जैन यांनी सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ येथे भेट देऊन संत हरदासराम, संत गेलाराम बाबा यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तसेच संत फकीर साई लखनौ यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, माजी नगरसेवक राजू आडवाणी, भगत बालाणी, ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद विसराणी, अशोक मंधान, रमेश मताणी, ओमप्रकाश कौराणी, माजी नगरसेवक मनोज अहुजा, जितेंद्र मुदंडा, आयुष मणियार आदींनी डाॅ. विजय दर्डा यांचे स्वागत केले.
३६ देशांतून भाविक
१७५ वर्षांची परंपरा असलेल्या उत्सवासाठी ३६ देशांतून भाविक आले होते. तीन दिवस अखंड पाठसाहेब व भजन-सत्संग झाला. ‘दिना बंधू दिनानाथ, मेरी डोरी तेरे हाथ’, ‘बाबा..साईराम’, ‘आयो लाल...झुलेलाल, अमरलाल.. कंवरलाल’ या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.