जळगाव : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या दोन कवितांना संगीतबद्ध करण्याचे भाग्य मला लाभले. त्यामधूनच त्यांची भेट झाली व त्यांनी दोन्ही कविता ऐकून दिलेली कौतुकाची थाप माझ्यासाठी आयुष्यातील ‘माईल्ड स्टोन’ असल्याचे भावनिक उद््गार जळगावातील संगीतकार संजय हांडे यांनी काढले.अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांच्या निमित्ताने त्यांच्या भेटी होण्यासह सान्निध्य मिळत त्यांच्या कवितांना संगीत देण्याचे भाग्य जळगावातील संजय हांडे यांना मिळाले आहे. या बाबत हांडे यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली.‘ही ओळ माझी नाही....’वाजपेयी यांच्या आठवणी जागविताना संजय हांडे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना संगीत देण्याची संकल्पना मला सुचली. त्यानुसार सर्व नियोजन झाले ‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ या कवितेस प्रथम संगीत देण्यात आले. ही कविता संगीतबद्ध करताना सुरुवातीला मी ‘जय जय धरती माता....’ अशी ओळ जोडत कवितेला सुरुवात केली. ही कविता त्यांना दाखविण्यासाठी गेलो त्या वेळी माझ्या सोबत ज्येष्ठ संगीतकार नौशाद हेदेखील होते. त्यावेळी वाजपेयी यांनी कविता पाहताच विचारले, पहिली ओळ माझी नाही, ती कोणी केली. त्यावर नौशाद यांनी सांगितले, ‘ये इस बच्चे की कमाल है...’, नको असल्यास काढून टाकतो, असे सांगताच वाजपेयी म्हणाले, नाही-नाही राहू, चांगली सुरूवात आहे. हे कौतूक ऐकून मला मोठा अभिमान वाटल्याचे हांडे म्हणाले. हे गीत २००२ ते २००४ या काळात विविध दूरचित्रवाणी वाहिणीनर प्रकाशितही झाले.भाषण संगीतबद्ध कसे होऊ शकते?वाजपेयी यांच्या ‘भारत जमिन का तुकडा नही....’ या दुसऱ्या गीताविषयी बोलताना हांडे म्हणाले, हे गीत म्हणजे वाजपेयी यांचे प्रत्यक्षात भाषण आहे. ‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ ही कविता संगीतबद्ध केल्यानंतर पुन्हा भाषणाचा अंश संगीतबद्ध करण्याविषयी गेलो असता त्या वेळी ते म्हणाले, ‘फिरसे आ गये...’ त्या वेळी मी वारंवार येईल असे उत्तर देत मी माझी संकल्पना सांगितली. त्यावर ते म्हणाले हे भाषण आहे, ते संगीतबद्ध कसे होणार, मात्र मी त्यांना विश्वास दिला. त्यानुसार ते संगीतबद्ध करीत त्यांना ऐकविण्यासाठी गेलो असता ‘भाषण संगीतबद्ध होऊ शकते याचा मी कधी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली व कौतूक केले.‘केशवस्मृती’ परिवाराची उपस्थिती‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ ही कविता संगीतबद्ध करण्याची संकल्पना संजय हांडे यांनी डॉ. अविनाश आचार्य यांना सांगितली. त्या वेळी केशवस्मृती प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. त्यानुसार केशस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, हिरानंद मंधवाणी, संजय हांडे, जयेश दोशी, उदय भालेराव हे दिल्ली येथे अटलविहारी वाजयेपी यांच्या प्रधानमंत्री निवासस्थानावर गेले. तेथे ‘जो बरसो तक लढे जेल मे उनको याद करो.....’ या गीताचे चित्रीकरण करण्यात आले. त्यात अटलबिहारी वाजपेयी यांचीही भूमिका असून त्या वेळी वाजपेयी यांच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळाल्याची आठवण प्रतिष्ठानचे प्रमुख भरत अमळकर यांनी सांगितली. विशेष म्हणजे या कविताचे हक्क प्रतिष्ठानला मिळाले आहे. प्रियदर्शन यांचे दिग्दर्शन असलेल्या या कवितेस ज्येष्ठ संगीतकार नौशाद यांनी संगीत दिले आहे.
Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना जळगावातून संगीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:08 PM
अटलजींकडून मिळालेली कौतुकाची थाप आयुष्यातील ‘माईल्ड स्टोन’ - संजय हांडे
ठळक मुद्देभाषण संगीतबद्ध कसे होऊ शकते?‘केशवस्मृती’ परिवाराची उपस्थिती