फैजपूर : भुसावळ रोडवरील अकलूद शिवारातील हॉटेल किनारावर भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, फैजपूर पोलिसांच्या पथकाने घातलेल्या संयुक्त धाडीत बेकायदा विक्रीसाठी ठेवण्यात आलेला लाखाचा मद्यसाठा व 20 हजार रुपये रोख असा 1 लाख 15 हजार 159 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केल्याने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई 3 च्या मध्यरात्री करण्यात आली. हॉटेल मालक हेमंत पृथ्वीराज (वय 48) (भुसावळ) व मॅनेजर गोपाळ पंडित कोळी (अकलूद) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 3 च्या रात्री सहायक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, फौजदार रामलाल साठे, हे.कॉ. जिजाबराव पाटील, सहायक फौजदार विजय पाचपोळ, चालक तायडे यांनी अकलूद शिवारात हॉटेल किनारावर अचानक धाड टाकून अवैध विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या व परवाना नसताना विक्री करीत असताना देशी-विदेशी मद्याचा साठा बियरच्या बाटल्या आढळून आल्या. मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाईप्रकरणी सहायक पाचपोळ यांनी फिर्याद दिल्यावरून हॉटेल मालक हेमंत पृथ्वीराज फालक व व्यवस्थापक गोपाळ पंडित कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. तपास सपोनि सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोहर मोरे करीत आहे. (वार्ताहर)
अकलूदच्या हॉटेल किनारावर धाड
By admin | Published: May 05, 2017 12:20 AM