जळगाव : उगवत्या सुर्याला अर्घ्य अर्पण करून रविवारी सकाळी उत्तर भारतीय संघाच्या छटपुजेची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित जोडप्यांतर्फे सुर्याशी आणि कांताई रुपातील छटमातेशी आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करण्यात आली.शनिवारी सायंकाळी मावळत्या सुर्याला अर्घ्य अर्पण करण्यात आले. त्यानिमित्त भजन, किर्तन आदी कार्यक्रम झाले. या पुजेला परिसरातून शेकडो भाविक मेहरूण तलावाच्या काठी दाखल झाले होते. पुजा शांततेत पार पडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांच्या सोयीसाठी महाप्रसादाचीही सोय करण्यात आली होती. या महाप्रसादाचा ४ ते ५ हजार भाविकांनी लाभ घेतला.रात्री १०.३० वाजता भजन कीर्तन झाल्यानंतर भाविक आपापल्या घरी परतले. रविवारी सकाळी सुर्योदयाला छटपुजेअंतर्गत दुसरे अर्घ्य असल्याने पहाटे ४ वाजल्यापासूनच भाविक मेहरूण तलावाच्या काठी दाखल झाले होते. यावेळी पाण्यात उभे राहून सुर्याकडे प्रकाश देण्यासाठी आणि उगवण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सुर्योदय होताच दुसरे अर्घ्य अर्पण करण्यात आले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्घ्य अर्पण केल्यानंतर प्रसाद वाटण्यात आला आणि त्यानंतर या पुजेची सांगता करण्यात आली. पहाटे दुघर्टना घडू नये, यासाठी मेहरूण किनारी उत्तर भारतीय संघ छटपुजा समितीतर्फेे विजेची सोय करण्यात आली होती.जलाराम बाप्पांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमजळगाव : बांभोरीनजीकच्या श्री जलाराम बाप्पा मंदिरात श्री जलाराम बाप्पांच्या २२०व्या जयंती-निमित्त विविध कार्यक्रम पार पडले.श्रीरामभक्त असलेल्या श्री जलाराम बाप्पांचा जन्म १७९९मध्ये गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील वीरपूर या गावात झाला. १८व्या वर्षी फतेहपूरचे संत भोजलराम यांना जलाराम बाप्पांनी आपले गुरु मानले आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांनी सदाव्रत नावाची साधूसंत आणि गरजूंसाठी धर्मशाळा बनवली. १९३७मध्ये त्यांनी देहत्याग केला. जलाराम बाप्पा यांचे देशाच्या कानाकोपऱ्यात भक्त असून यंदा त्यांच्या जयंतीचे २२०वे वर्ष आहे. त्यांची श्रध्दापूर्वक प्रार्थना केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रध्दा आहे.रविवारी आयोजित जयंती कार्यक्रमानिमित्त सकाळी ९ वाजता भजन, किर्तन आदी कार्यक्रम झाले. दुपारी १२.३० वाजता महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाआरतीच्यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल तसेच स्वामी नारायण मंदिरातील संत उपस्थित होते. यावेळी शेकडो भाविकांनी श्री जलाराम बाप्पांचे दर्शन घेतले.
विविध उत्सवांनी वातावरण भक्तीमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 10:16 PM