लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या काळात जळगाव जिल्ह्यात मार्च व एप्रिल या दोन महिन्यात २२ महिलांवर बलात्कार झाले आहेत तर ४६ महिलांचा विनयभंग झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. या दोन महिन्यात महिला अत्याचाराच्या ६८ घटना घडलेल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. आस्थापना विविध उद्योग बंद ठेवण्यात आले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये देखील फक्त पाच टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थिती लागू आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वेगवेगळ्या क्षेत्रावर झालेला आहे, असे असताना महिला अत्याचाराच्या घटना मात्र कमालीच्या वाढलेल्या आहेत. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात बलात्काराच्या ४० तर विनयभंगाच्या ९८ अशा १३८ घटनांची पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेली आहे.
२०१९ मध्ये जळगाव जिल्ह्यात बलात्काराच्या १०९ घटना घडल्या होत्या तर २०२० मध्ये ९१ घटना घडल्या होत्या. महिन्याला सरासरी ७ ते ८ घटनांची नोंद होती. आता या चार महिन्यात बलात्कार ४० घटना घडलेल्या आहेत, सरासरी एका महिन्यात बलात्काराच्या १० घटना घडत आहेत. विनयभंगाच्या चार महिन्यात ९८ घटना घडलेल्या आहेत. मागील वर्षभरात विनयभंगाच्या ३०४ घटना घडल्या होत्या.