आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२५ -पंधरा वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाºया राहुल विजय चौधरी-वाघ (वय २४ रा.डी सेक्टर, प्लॉट क्र.२७, पंच रत्न अॅग्रो कंपनी, औद्योगिक वसाहत, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. दरम्यान, या घटनेतील पीडित मुलीने आई-वडिलांकडे जाण्यास नकार दिल्याने तिची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाºया एका पंधरा वर्षीय मुलीशी राहुल याने प्रेमसंबंध प्रस्थापित करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून १९ जून रोजी सकाळी ११ वाजता तिच्या घरुन पळवून नेले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने दुसºयाच दिवशी २० जून रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे घटना कथन केली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन प्रथम अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा तपास सहायक निरीक्षक समाधान पाटील यांच्याकडे सोपविला.
प्रारंभी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर राहुल याच्याविरुध्द बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचे वाढीव कलम लावण्यात आले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्या.के.बी.अग्रवाल यांनी २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मुलगी अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. सहायक निरीक्षक समाधान पाटील व कॉन्स्टेबल भरत लिंगायत यांनी पीडित मुलगी व राहुल याचा शोध घेतला. नंतर दोघंही नांदुरा, जि.बुलडाणा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार समाधान पाटील व लिंगायत यांनी राहुल याच्या बहीण व मेहुण्यांकडे चौकशी केली. गुन्हा करण्यात मदत केली म्हणून तुम्ही आरोपी होऊ शकतात, याची जाणीव दोघांना करून दिली. अटकेच्या भीतीने दोघांनी राहुल व मुलीची माहिती सांगितली व त्याचवेळी राहुलचा फोन नातेवाईकांना आला. त्यांनी आम्ही धोक्यात आहोत असे सांगून त्याला तातडीने घरी बोलावले. घरी येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.