ठळक मुद्दे पूर्ववैमनस्यातून घडली घटना दुचाकी आडवी लावून केले सपासप वार हल्लेखोर पसार
जळगाव : निमखेडी येथून दुचाकीने शहरात येत असलेल्या अनिल एकनाथ नन्नवरे (२३, रा. निमखेडी, जळगाव) या तरुणावर रस्त्यात दुचाकी आडवी लावून दोघांनी चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता दादावाडी परिसरात घडली. विशाल अनिल पाटील (रा.साईनगर, जळगाव) व महेश उर्फ डोम्या वासुदेव पाटील (रा.हिराशिवा कॉलनी, जळगाव) या दोघांनी हा हल्ला केल्याचे जखमी अनिल याने पोलिसांना सांगितले. अनिल हा मंगळवारी न्यायालयाकडे येत असताना या दोघांनी एकमेकाकडे पाहिले होते. खुन्नस ने का पाहतो? या कारणावरुन तिघांमध्ये वाद झाला होता. बुधवारी तो शहरात येत असताना विशाल व महेश या दोघांनी दादावाडी परिसरात त्याच्या दुचाकीच्या समोर दुचाकी आडवी लावून त्याला अडविले व काही कळण्याच्या आतच अनिलवर चॉपरने सपासप वार केले. यात छातीत, पोटात, मांडीवर व हातावर खोलवर गंभीर जखमा झाल्या आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला ओळखीच्या लोकांनी खासगी दवाखान्यात हलविले. अनिल याची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत, सहायक निरीक्षक गणेश चव्हाण, जितेंद्र पाटील व सतीश हळणोर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमीची विचारपूस करुन जबाब नोंदविला.हल्लेखोरांच्या शोधार्थ पथक रवानापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लयानंतर हल्लेखोर लगेच पसार झाले असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहे. गेल्या महिन्यात देखील अनिलशी या दोघांचा वाद होता. अनिलचा भाऊ सुनील वाळूचा व्यवसाय करतो. जखमी अनिलवर आर्म अॅक्ट व हाणामारीचा गुन्हा दाखल आहे तर आरोपी महेशविरुध्दही मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे. जखमीचा भाऊ देखील पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. पूर्ववैमनस्यातून हा वाद झाला असला तरी पाळत ठेवूनच अनिलवर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.जळगाव शहरात तरुणावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 9:29 PM