लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून विजय एकनाथ घुले (वय ३८, रा.आसोदा, ता.जळगाव) या तरुणावर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याच्या प्रकरणात जि. प.सदस्य पती जितेंद्र उर्फ रवी बाबूराव देशमुख, भरत बाळू पाटील व योगेश डिगंबर कोल्हे (सर्व रा. आसोदा, ता.जळगाव) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
विजय घुले या तरुणाने जुन्या वादातून गेल्या आठवड्यात रवी देशमुखविरोधात जिल्हा पेठ पोलिसांत तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून जितेंद्र देशमुखसह योगेश डिगंबर कोल्हे आणि भरत बाळू पाटील यांनी १४ मे रोजी दुपारी १ ते १.१५ वाजेच्या सुमारास विजय घुले यांच्यावर तलवारीचा धाक दाखवून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी शनिवारी रात्री विजय घुले यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांच्याकडे गेले. त्यांनी देशमुखसह तिघांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यांच्या पथकाने पहाटे जालना जिल्ह्यातून अटक केली. तिघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास उपनिरीक्षक कल्याण कासार करीत आहे.