जळगाव : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेटू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना आवरत धक्का बुक्की केली. हा प्रकार विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारकडून होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आणि नियमावलीला काही विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एबीव्हीपी कार्यकर्त्यांना मंत्री उदय सामंत यांना भेटीची वेळ मागितली होती. मात्र, सामंत यांनी भेट देण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.