लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : येथील महामार्गाला लागून असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम भर दिवसा फोडण्याचा अज्ञात चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. यामुळे शहरात भीती पसरली असून, गेल्या आठ दिवसांतअशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.
याबाबत प्रभारी व्यवस्थापक किरण बडेकर यांनी पारोळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, २३ ते २५ तारखेदरम्यान सुट्टी असल्याने बँक बंद होती. दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीत बँकेस लागून असलेले एटीएम जे रिसायकलिंग यंत्र आहे, ते कुणीतरी अज्ञात चोरट्याने फोडल्याचा निरोप बँकेचे पूर्वी कृषी विभाग सांभाळणारे गिरीराज ठाकरे यांनी बडेकर यांना दूरध्वनीवरून दिला.
बँकेत येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता एटीएम मशीनचा दरवाजा तुटलेला दिसला. चोरीची शंका आल्याने पारोळा पोलिसांत माहिती दिल्याचे बडेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याबाबत पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या पथकाने पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज पाहून फिर्याद नोंदवली. यावेळी फिंगर प्रिंट तज्ज्ञांनाही पाचारण केले होते. याबाबत गुन्हा नोंद होऊन तपास विनोद साळी करत आहेत.
दोन लाखांची रक्कम सुरक्षित
या शाखेचे मुख्य व्यवस्थापक आजारी असल्याने हा पदभार किरणकुमार बडेकर यांच्याकडे आहे. न्यूमरिक कुलूप आरोपीला तोडता न आल्याने एटीएममधील दोन लाखांची रक्कम सुरक्षित असावी, असे बडेकर यांनी सांगितले.