जळगाव - कारागृहात बंदी असणाऱ्या चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला आहे. त्यांच्या शविच्छेदन अहवालाच्या व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत दोषी असलेल्या कारागृह अधीक्षकासह कर्मचाऱ्यांतर्फे व्हिसेरा चाचणी प्रक्रियेत लाच देऊन फेरफार करण्याचा प्रयत्न संशयितांकडून केला जात असल्याचा आरोप मयताची पत्नी मीनाबाई जगताप यांनी धुळ्याच्या न्याय वैद्यक प्रयोगशाळा भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाच्या मुख्य अधिष्ठाता यांना दिलेल्या अर्जात केला आहे.
११ सप्टेंबर २०२० रोजी चिन्या उर्फ रवींद्र जगताप याचा जळगाव जिल्हा कारागृहातील अधीक्षक पेट्रस गायकवाड, जेलर जितेंद्र माळी व इतर रक्षक कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यु झालेला आहे. या प्रकरणात संशयास्पदरित्या प्रचंड विलंब होत असल्याने अखेर नाईलाजाने औरंगाबाद खंडपीठात संबंधिताविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी याचिका दाखल केलेली आहे व प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असे त्यात म्हटले आहे.
शव-विच्छेदन अहवाल व डेथ मेमोची छायांकित प्रत प्राप्त झालेली असून त्यामध्ये स्पष्ट मृत्युचे कारणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. डेथ मेमोमध्ये चिन्याचा मृत्यू कारागृहात झाला असल्याबाबत वेळेसह उल्लेख करण्यात आलेला आहे. इन कॅमेरा शव-विच्छेदन करण्यात आलेले आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत अंतिम व्हिसेरा चाचणी अहवालात संबंधित विभागातील अज्ञात अधिका-यांस लाखोंची लाच देवून फेरफार करण्याचे षडयंत्र योजिले आहे. त्यामुळे तात्काळ या प्रकरणी योग्य ती कारवाई होवून न्याययुक्त व पारदर्शक अहवाल द्यावा, अशी मागणी चिन्याची पत्नी मीनाबाई यांनी अर्जातून केली आहे.