लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : कोरोनाची लस घेतल्यानंतर त्रास जाणवू लागला म्हणून डॉक्टरकडे गेलेल्या एका रेल्वे सुरक्षा बलाचे पीएसआयला मारहाणीचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शहर पोलिसात दाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वेत कार्यरत असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पीएसआय डॉ. विजय साळवे यांनी कोरोना लस घेतल्यानंतर सर्दी-तापची लक्षणे जाणवली. त्यानंतर ते रेल्वे हॉस्पिटलचे अपर मुख्य चिकित्सा अधिक्षक डॉ. सिध्देश कुमार यांच्याकडे गेले. परंतु डॉ. सिध्देश यांनी डॉ. साळवे यांना मारण्याचा प्रयत्न केला. डॉ. साळवे यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस स्थानकात डॉ. सिध्देश कुमार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डॉ. विजय साहेबराव साळवे (रेल्वे क्वार्टर, बंगला रेल्वे कॉलनी, वरणगाव रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १० मार्च २०२१ रोजी माझी तब्येत कोरोना वॅक्सिन घेतल्याने जास्त खराब झाली व मी सर्दी-ताप बरा होण्यासाठी मंडळ निरीक्षक रवी शर्मा यांची सहमती घेऊन रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथे जवळपास दुपारी ४:१५ ते ४:४५ वाजेच्या दरम्यान गेलो आणि केस पेपर काढून डॉक्टरचे अटेडंट यांना केस पेपर दाखवुन मास्क लावून आत गेलो आणि पॅथोलॉजिस्ट डॉ. सिध्देशकुमार यांना करून सांगितले की, मला कोरोना वॅक्सिन घेतल्याने सर्दी-ताप आला आहे. त्यावर डॉक्टरांना वाटले की, मी कोरोना पेशंट आहे. म्हणुन त्यांनी औषधी लिहिता लिहिता बाहेर जा. असे हिंदित एकेरी भाषेत बोलून हिंदीमध्ये शिव्या देत वाॅश-बेसिन जवळील स्टीलचा रॉड आपल्या उजव्या हातात घेऊन माझ्या दिशेला मारायला आले, तेव्हा मी लगेच आपल्या बचावासाठी मोबाईल माझ्या पॅन्टच्या खिशातुन काढुन शुटिंग मोडवर लावला व शुटिंग घेऊ लागताच डॉक्टरने आपल्या उजव्या हातातील स्टिल रॉड लगेच आपल्या डाव्या हातात घेऊन मोबाईल शुटिंगमध्ये येऊ नये म्हणून आपल्या डाव्या पायाजवळ समांतर लपवला व डावा हाथ वर करुन मला मारण्याचा प्रयत्न केला.
मला हिंदीत म्हटले की, ‘तू जानता नही, में काैन हूॅं? म्हणत बाहेर हाकलून लावले, त्यावर लगेच मी ही घटना रेल्वे हॉस्पीटलचे चीफ डॉ. श्रवण कुमंडवी, मुख्य चिकित्सा अधिक्षक (प्रभारी) यांना सांगितली. तसेच माझ्या मोबाईलमधील शुटिंगदेखील त्यांना दाखवली. त्यावर त्यांनी या डॉक्टरची लेखी तक्रार करण्याचा सल्ला दिला. नंतर मी गोळ्या घेऊन ऑफिसला आलो व साहेब लोकांना घटना सांगितली. त्यावर त्यांनी तक्रार करण्याचा सल्ला दिला, यानंतर माझी तब्येत खराब झाली म्हणून माझ्या रेल्वे क्वार्टरवर गेलो. गोळ्या घेतल्या, आज जरा बरे वाटतंय म्हणून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केली आहे.