रावेर : तालुक्यातील पाल येथे मंजूर असलेले शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय व प्रक्रिया केंद्र जिल्ह्यात इतरत्र पळवून लावण्याचे घाट घातले जात असल्याने त्याला विरोध करण्यासाठी शिवसेना उपोषणाचे बस्तान मांडण्याच्या बेतात होती. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे व जमावबंदी आदेशामुळे शिवसेनेतर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देवून तो बेत हाणून पाडण्यासाठी शासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.गत महायुतीच्या काळात तालुक्यातील पाल येथे शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय व प्रक्रिया तथा संशोधन केंद्र मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, पाल येथे संबंधित महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध नसल्याच्या सबबीखाली खिरोदा प्र.यावल येथे स्थलांतरित करण्याची बाब तत्कालीन दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांनी प्रस्तावित केली होती.मात्र, शिवसेनेतर्फे सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय व प्रक्रिया केंद्र जिल्ह्यात इतरत्र पळवून लावण्याचे घाट घातला जात आहेत. संबंधित शासकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना मिळणारी नोकरी व रोजगाराच्या संधी मुकावे लागणार आहे किंबहुना पाल ग्रामपंचायत या शासकीय महाविद्यालयासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी तयार आहे. असे असतानना हे महाविद्यालय पळवून लावण्यासाठी सुरू असलेले शहकाटशहाचे राजकारण हाणून पाडण्यासाठी शिवसेना आमरण उपोषणासाठी रस्त्यावर उतरली आहे. कोरोना महामारीमुळे व शासनाच्या जमावबंदीच्या आदेशामुळे प्रशासनाने उपोषणाला परवानगी नाकारली असली तर , शिवसेना शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थलांतरित करण्याचा बेत हाणून पाडण्यासाठी सदैव कटिबध्द असून शिवसेना तीव्र विरोध करीत असल्याने शासनाने गंभीर दखल घ्यावी, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.रावेर तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना व रावेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना यासंबंधी शिवसेना शहरप्रमुख नितीन महाजन, शिवसेना आदिवासी आघाडी तालुकाप्रमुख हुसेन तडवी, तालुका सरचिटणीस कन्हैया गणवानी, युवा सेना शहरप्रमुख राकेश घोरपडे, शिवसेना बुथप्रमुख राहुल जैन यांनी हे निवेदन दिले.
रावेर तालुक्यात मंजूर शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय पळवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 4:00 PM
पाल येथे मंजूर असलेले शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय व प्रक्रिया केंद्र जिल्ह्यात इतरत्र पळवून लावण्याचे घाट घातले जात आहे.
ठळक मुद्देरावेर : शिवसेनेच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याने तहसीलदारांना निवेदनशासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी