लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - यावल तालुक्यातील कासवा गावाजवळील तापी नदीच्या पात्रात सोमवारी सायंकाळी ५ वाजता अज्ञात प्राण्याने एका २२ वर्षीय युवकाला नदीमध्ये खेचण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने या युवकाला तत्काळ स्वत:ला सावरत, त्या प्राण्याचा तावडीतून सोडवत प्राण वाचविले आहेत. दरम्यान, हा प्राणी नेमका कोणता याबाबत संबंधित युवकाला कोणतीही माहिती देता आली नसली तरी वनविभाग व वन्यजीव अभ्यासकांच्या मते पानमांजर असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याठिकाणी शोधमोहिम राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कासवा गावातील एक मजूर युवक लोकेश राजेंद्र धनगर हा सोमवारी सायंकाळी ५ वाजता नदीकाठावर हातपाय धूत असताना त्या वेळी अचानक एका अज्ञात प्राण्याने त्या युवकावर हल्ला चढविला, तसेच नदीत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. युवकाने झटका देवून या प्राण्यापासून स्वत:ला सोडविले. तसेच घटनास्थळावरून पळ काढला. याबाबतची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेच्या स्कायलेब डिसुझा, रोहित श्रीवास्तव, सतीश कांबळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनाक्रम जाणून घेतला. संबंधित युवकाने दिलेल्या माहितीनुसार नदीच्या किनाऱ्यावर हात-पाय धूत असताना, अचानक पाण्यातून एक प्राणी आला, आणि त्याने ओढण्याचा प्रयत्न केला. या प्राण्याला कान असल्याचे युवकाने सांगितले. दरम्यान, या प्रकरणामुळे कासवा परिसरात भितीचे वातावरण असून, याबाबत शोध घेण्याची मागणी केली जात आहे.
कोट..
हा प्राणी कोणता हे कारण अद्याप गुलदस्त्यात असून वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांना माहिती दिली आहे. या ठिकाणी शोध मोहीम राबवून नेमके कारण शोधण्याची गरज आहे.
- स्कायलेब डिसुझा , मत्स्य अभ्यासक, वन्यजीव संरक्षण संस्था,
जिल्ह्यात मगरीचे अस्तित्व सिद्ध झाले नाही. मात्र ज्या प्रमाणे तरुण वर्णन करत आहे त्या नुसार सदर अज्ञात प्राणी पाणमांजर असू शकतो. मात्र, तरुणास ओढून नेईल इतका मोठा प्रयत्न पाणमांजर करणार नाही. पाण्यातील एखाद्या काटेरी झुडपात किंवा तत्सम वस्तुत देखील पाय अडकू शकतो आणि जखम होऊ शकते नेमके कारण शोधावे लागेल.
-बाळकृष्ण देवरे, वन्यजीव अभ्यासक, वन्यजीव संरक्षक संस्था