आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२६- मतदारसंघातील रस्ते, रेल्वे व पाणी प्रश्नाची अनेक कामे केली. प्रलंबित पुलांचे विषय मार्गी लावल्याची माहिती जळगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार ए.टी. पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. केंद्रातील आघाडी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार ए.टी. पाटील यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, तीन वर्षात रेल्वेशी संबंधित विविध कामांना गती दिली.
भुसावळ - मनमाड तिसरी रेल्वे लाईन व जळगाव-भुसावळ चौथी लाईन केली जात आहे. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. असोदा, पिंप्राळा, दूध फेडरेशन, अमळनेर जळोद रस्ता, अमळनेर -धरणगाव, कजगाव या सहा रेल्वे उड्डाणपुलांना मंजुरी मिळविली आहे. पिंप्राळा व कजगावची निविदा प्रक्रिया सुरू आहे. असोदा पुलाचे नकाशे तयार झाले आहेत. दूध फेडरेशन, अमळनेर-जळोद पुलांचे काम राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामात केले जातील. उधना-जळगाव दुहेरी करणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. चाळीसगाव - शिदवाडी बोगद्याला १ कोटी २५ लाख मंजूर करून घेतले हे कामही पूर्णत्वास आले आहे. जळगाव शहरास मॉडेल स्टेशनचा दर्जा मिळाला मात्र विविध सुविधा अपूर्ण होत्या. त्यासाठी पाठपुरावा करून लिफ्टचे काम सुरू केले आहे. तसेच जळगाव व चाळीसगाला सरकता जिना बसविण्याचा निर्णय झाला आहे. सचखंड एक्सप्रेसला चाळीसगाव येथे थांबा, नव्याने सुरू झालेली लोकमान्य टिळक टर्मिनस लखनौ एक्सप्रेसला जळगावी थांबा मिळाला.