ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरच्या भूमिपूजनप्रसंगी गिरीश महाजन यांचे प्रतिपादनचाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.येथील शासकीय दूध डेअरी मैदानावर शुक्रवारी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुल शासकीय ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे भूमिभूजन करताना ते बोलत होते.व्यासपीठावर खासदार ए. टी. पाटील, आमदार उन्मेश पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पवार, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील, उपअभियंता एन.पी.सोनवणे, तहसीलदार कैलास देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नाजीर शेख, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, उपसभापती संजय पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष के. बी. साळुंखे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी खासदार ए. टी. पाटील यांनी आपल्या मनोगता व्यक्त करताना म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यातील सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमुळे नागरिकांना उपचारासाठी लांब जावे लागणार नाही. तालुक्यातील जनतेची खूप वर्षांची ही मागणी आता पूर्ण होत आहे.आमदार उन्मेश पाटील म्हणाले, तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधेसाठी एकमेव असे ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयात किरकोळ आजारावर उपचार केले जातात. अपूर्ण सुविधेमुळे नागरिकांना वेळीच उपचार मिळत नव्हते. यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे आधुनिकीकरण होणे गरजेचे होते. तसेच शहर व परिसरात अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना धुळे, जळगाव किंवा नाशिक येथे पाठवावे लागत होते. यासाठी शासनाने चाळीसगाव तालुक्यासाठी सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालयासाठी साडेबारा कोटी रुपये व ट्रॉमा केअर सेंटरसाठी दोन कोटी २६ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. ३६ हजार चौरस फुट जागेवर साडेबारा कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे ग्रामीण रुग्णालय हे ३० खाटांचे असणार आहे. या रुग्णालयात जनरल वार्ड, पुरुष महिला वार्ड, सर्जिकल ओपीडी, एक्सरे रुम, पॅथोलॉजी लॅब, आॅपरेशन थिएटर, मेडिकल स्टोअर, क्रिटीकल केअर आदी सुविधा आहे. संपूर्ण बांधकाम हे आरसीसीमध्ये होणार आहे. या रुग्णालयाला फर्निचर, बगीचा, संपूर्ण संरक्षक भिंत असणार आहे. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अपघातातील रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार होणार आहे. यामध्ये सोनोग्रामी, एक्स रेसारख्या विविध सुविधा आहे.सुरवातीस मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यानंतर कोनशिलेचे अनावरणदेखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मंत्र्यांचा विविध समित्या, संस्थांंच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. तसेच सेवानिवृत्त कृषी अधिकारी सर्जेराव पाटील, नगरपरिषदेचे रमेश सोनवणे यांनी त्यांच्या पत्नीसह संपूर्ण देहदानाचा संकल्प केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर एका महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल निरव पाटील या आठवीच्या मुलाच्या त्याच्या आई-वडिलांसमवेत सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास भडगाव, पाचोरा, तसेच धुळे, नंदुरबार येथील मान्यवर, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, नगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, चाळीसगाव तालुक्यातील विविध समित्यांचे संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाळीसगावात उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:58 PM