गेल्या आठवड्यात ‘ब्रेक द चेन’ विषयी काढण्यात आलेल्या आदेशानंतर व्यापारी वर्गासह सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या आदेशानुसार कोणते व्यवसाय सुरू ठेवावे व कोणते बंद ठेवावे, वीकेण्डला काय सुरू राहणार, काय बंद राहणार याविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. इतकेच नव्हे लोकप्रतिनिधीदेखील राज्य सरकारच्या आदेशाबाबत संभ्रमात आहेत. या आदेशामध्ये काही सुधारणा करून व्यापारी वर्गासह जनतेलाही सोयीचे व्हावे यासाठी नवीन आदेश काढत दिलासा देण्याचा प्रयत्न आठवडाभरात झाला. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाच्यावतीनेदेखील विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये सुरुवातीला कडक निर्बंध लावण्यासह नंतर तीन दिवसांचा जनता कर्फ्यू करण्यात आला. त्यानंतर पुन्हा मार्च महिन्याच्या अखेरीस तीन दिवस कडक निर्बंध लावण्यात आले. चार दिवस सुरळीत व्यवहार होत असताना पुन्हा राज्यसरकारने ‘ब्रेक द चेन’ लागू केले. हे करीत असताना यामध्ये लावलेले निर्बंध पाहता हा एक प्रकारचा लॉकडाऊनच असून सरकारने केवळ नाव बदलून व्यापाऱ्यांची फसगत केल्याचा आरोपदेखील व्यापाऱ्यांकडून करण्यात आला. असे होत असताना या आदेशात मोठा संभ्रम असल्याने काय करावे आणि काय करू नये यात व्यापारीवर्ग अडकला. इतकेच नव्हे याबाबत लोकप्रतिनिधीदेखील संभ्रमात असल्याचे दिसून आले. त्याची प्रचिती जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आली.
जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत राज्य सरकारच्या निर्णयाविषयीदेखील चर्चा झाली. ४ एप्रिल रोजी राज्य सरकारने शनिवार, रविवार संपूर्ण लॉकडाऊन व इतर दिवशी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे आदेश काढले. या आदेशानुसार शनिवार, रविवार इतर सेवांसह अत्यावश्यक सेवादेखील बंद राहणार का, इतर दिवशी उर्वरित सर्व दुकाने सुरु राहतील की नाही, असा सवाल लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. या आदेशात स्पष्टता नसल्याने सरकारदेखील संभ्रमात आहे, मंत्र्यांनी वेगळी घोषणा करायची व अध्यादेश वेगळा काढायचा असे प्रकार सुरू असल्याचा आरोप झाला. जिल्हा पातळीवर जे व्यवहार सुरू आहे त्यांच्याशी पूरक व निगडित व्यवहार सुरू करण्यासाठी सुधारित आदेश काढण्यात आले. तसेच शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला फळ विक्री ही दुकाने सुरू ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले. शुक्रवारी व सोमवारी होणारी गर्दी टाळता यावी व नागरिकांना सुटीच्या दिवशी खरेदी करता येऊन गर्दी कमी करण्याचा प्रयत्न याद्वारे झाला. यातून अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांना व नागरिकांना दिलासा मिळाला मात्र जी दुकाने बंद आहेत त्यांना व्यवसाय सुरू करण्याविषयीच्या आदेशाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.