लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे बुधवारी आयआयटी जेईई ही परीक्षा जळगाव जिल्ह्यातील तीन केंद्रांवर आयोजित करण्यात आली. यात जिल्हाभरातून ६५२ पैकी ६२६ परीक्षार्थी उपस्थित होते. कोरोनासाठीचे नियम पाळून ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही
परीक्षा गुलाबराव देवकर महाविद्यालय, केसीई सोसायटीचे आयएमआर आणि भुसावळचे संत गाडगेबाबा महाविद्यालय या केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. त्याच प्रमाणे गुरुवार आणि शुक्रवारीदेखील परीक्षा होणार आहे.
आयआयटीच्या प्रवेशासाठी जेईई ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. यात आयएमआरच्या केंद्रावर १७२ विद्यार्थी, गुलाबराव देवकर महाविद्यालयात २२७ आणि भुसावळच्या संत गाडगेबाबा महाविद्यालयात २२७ विद्यार्थी उपस्थित होते.
ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली. त्यात पहिल्या टप्प्यात सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ते ६ ही वेळ होती. बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात ही परीक्षा पार पडली. त्यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांचा समावेश होता. एनटीएने एका खासगी कंपनीचे तांत्रिक सहकार्याने ही परीक्षा घेतली. त्यात कंपनीच्या सर्वरचा उपयोग करण्यात आला होता. तर इतर तांत्रिक बाबी आणि वर्ग खोल्या या स्थानिक महाविद्यालयांकडून एनटीएने घेतल्या होत्या.
या परीक्षांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती.