संचारबंदी कायम
संपूर्ण जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) घोषित करण्यात आली आहे. या संचारबंदीदरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार (संबंधित कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील); बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहणार आहे. ऑटोरिक्षामधून चालकवगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येणार आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक, पेट्रोलपंप, गॅरेजेस अशा आस्थापनांना सूट राहणार आहे.
केवळ निवेदन देता येणार
गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली यांना बंदी घालण्यात आली आहे. यात केवळ पाच जणांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल, असे आदेशात म्हटले आहे.
कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना व आदेश
- अभ्यासिका ( लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येतील.
- सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, दिंडी व तत्सम धार्मिक कार्यक्रम यांना बंदी
- सर्व प्रकारचे सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.
- सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक व तत्सम कार्यक्रम यांना बंदी तसेच सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी
- कायद्यानुसार बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादेत परवानगी राहील. तथापि, याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचित करणे आवश्यक राहाणार आहे. मात्र जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा व जळगाव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या मर्यादेतून सूट राहणार आहे.
- सर्व प्रकारच्या खासगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर याबाबींचे पालन करून घेणे बंधनकारक राहणार आहेत. तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या संशयित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांवर राहणार आहे.