लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बांधकाम विभागाच्या ५० लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ई -निविदांना मंजूर करण्याबाबत शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. गेल्या महिन्याची तहकूब सभा आणि नियमित सर्वसाधारण सभा शुक्रवारी दुपारी दोन वाजता शाहू महाराज सभागृहात आहे. निधीसाठी असलेला कमी कालावधी यामुळे हा विषय चर्चेचा ठरण्याची शक्यता आहे.
पुढील सर्वसाधारण सभेपर्यंत सर्व विभागांच्या ५० लाखांपेक्षा अधिक रकमेच्या व प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध रकमेच्या ई -निविदा स्वीकारून पुढील सभेपर्यंत कार्योत्तर मान्यता मिळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. बांधकाम विभागाकडील ई-निविदा कक्षाकडून विकास कामांच्या सुमारे १४४ इतक्या निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे ही कार्यवाही स्थगित केली होती. निविदांमधील मंजूर कामे ही २०१९- २०२० या आर्थिक वर्षात मंजुरी दिली असल्याने या कामांचा निधी ३१ मार्च २०२१ पर्यंत वापरणे आवश्यक आहे. सभा तीन महिन्यांनी होत असल्याने अडचण निर्माण होऊन निधी परत जाण्याची शक्यता असल्याने या निविदांना याच सभेत मंजुरी मिळण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तहकूब सभेतील हा विषय आहे. मध्यंतरी आचारसंहिता लागल्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली होती.
अनेक महिन्यांनी ऑफलाईन सभा
कोरोनाच्या काळात गेल्या काही महिन्यांपासून सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन होत असल्याने सदस्यांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.मात्र, शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता अनेक महिन्यातून ही सभा ऑफलाईन होणार असल्याने शिवाय दोन सभा असल्याने ही सभा वादळी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.