जळगाव : जिल्ह्यातील २७ पैकी २१ वाळू गटांच्या लिलावाला राज्याच्या पर्यावरण समितीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता या २१ वाळू गटांचा लिलाव २० जानेवारी रोजी होणार आहे. या वाळू गटांमधून ७० हजार २८६ ब्रास वाळू उत्खननासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाळू गट लिलावासाठी २८ कोटी ६४ लाख ८५ हजार ७३६ रुपये हातची किंमत ठरविण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरापासून वाळू गटांचे लिलाव रखडले होते. त्यात कोरोनामुळे पर्यावरण समितीचीही बैठक होत नव्हती. अखेर गेल्या महिन्यात ही बैठक झाली व जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या २७ वाळू गटांपैकी २१ वाळू गटांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये रावेर, चोपडा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल व जळगाव तालुक्यातील गटांचा समावेश आहे. सर्वाधिक आठ वाळू गट रावेर तालुक्यातील असून त्याखालोखाल एरंडोल तालुक्यातील पाच, धरणगाव तालुक्यातील तीन, जळगाव व अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन व चोपडा तालुक्यातील एका वाळू गटाचा समावेश आहे.
यंदा गौण खनिज वसुलीच्या उद्दिष्टात गेल्या वर्षाच्या तुलनेत दीडपट वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ७० कोटी उद्दिष्ट असलेल्या जिल्ह्यासाठी यंदा १०५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात २१ वाळू गटांचा आता २० जानेवारी रोजी लिलाव होणार आहे.