अन्यथा वाहन विक्री करून थकबाकी वसूल करण्यात येईल, अशी माहिती पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांनी ‘लोकमत’ला दिली. पाचोरा तहसील कार्यालय आवारात ३० ते ३२ ट्रॅक्टर बऱ्याच महिन्यांपासून जप्त केले असून अवैध वाळू प्रकरणी १ लाख २० हजार प्रत्येक वाहनाचा दंड आकारला जातो. त्यामुळे अशा भंगार ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करून त्याची किंमतदेखील दंडाच्या रकमेएवढी नसल्याने अवैध वाळू वाहतूकदार जप्त ट्रॅक्टर परत घेऊन जात नाहीत. रात्रीच्या वेळी परिसरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत हे वाहनधारक जप्त ट्रॅक्टरचे पार्ट, टायर, बॅटरी काढून घेऊन जातात, याकडे कुणाचेच लक्ष नसते किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. यामुळे जप्त ट्रॅक्टर दंड भरून मालक घेऊन जात नसल्याने हे भंगार ट्रॅक्टर आवारात उभेच आहेत.
त्यावर आरटीओकडील नंबरप्लेट नसते किंवा आरटीओकडून कारवाई होत नाही. यामुळे वाहन मालकाचे फारसे नुकसान होत नसल्याने अशा जप्त ट्रॅक्टरकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र तहसील आवार यामुळे ट्रॅक्टर डेपो म्हणून दिसत आहे. यामुळे तहसील कार्यालय आवारात घाणीचे साम्राज्य दिसून येत असून तहसीलदारांनी तातडीने कार्यवाही करावी व आवार स्वच्छ करण्याचे आदेश द्यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.