जळगाव: एका सिरीयल निर्मात्या कंपनीने टीव्ही मालिकांमध्ये सास-बहूच्या भांडणांचा रतीब घालून लागोपाठ त्याच पद्धतीच्या मालिका सादर करून मालिकांचा दर्जा व प्रेक्षकांची आवडही बिघडवून टाकली आहे. बहुतांश टीव्ही मालिकांमध्ये वास्तवता नाही. चांगल्या मालिकांची निर्मिती होण्यासाठी प्रेक्षकांनी आपली आवड बदलून या सास-बहूच्या मालिकांकडे पाठ फिरविली पाहिजे, असे आवाहन टीव्ही, चित्रपट व नाट्य कलावंत संतोष जुवेकर यांनी रविवारी दुपारी पत्रपरिषदेत केले.मु.जे. महाविद्यालयात आयोजित ‘खान्देश गॉट टॅलेंट’ स्पर्धेनिमित्ताने आलेल्या जुवेकर यांनी महाविद्यालयाच्या ‘इव्हेंट विभागात’ पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केसीई सोसायटीचे सदस्य प्रा.चारूदत्त गोखले, समन्वयक चंद्रकांत भंडारी, पत्रकारिता विभाग प्रमुख विश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.वेबसिरीजमुळे अनेक चाहते मिळालेवेबसिरीजमध्येही काम केले आहे. त्याचा अनुभव कसा वाटतो? या प्रश्नावर जुवेकर म्हणाले की, यू-ट्यूबवर सेन्सॉरबोर्ड नाही. त्यामुळे कलाकार म्हणून हवे तसे व्यक्त होता येते. कारण चित्रपट, नाट्य कलावंत म्हणून प्रतिमा निर्माण झालेली असली तरीही त्याआधी मी एक माणूस आहे. माझ्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना मला बघताना त्यात सहजता वाटली पाहिजे. त्याप्रमाणे वेबसिरीजमध्ये अगदी सहज व्यक्त झालो. त्यामुळे त्या वेबसिरीजमुळे खूप चाहते मिळाले. भविष्यात काही वेब फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स करण्याचा विचार आहे.गरजेपेक्षा जास्त निर्मितीमुळे मराठी चित्रपट प्रेक्षकांविनामराठी चित्रपटांना पुरेसा प्रेक्षक मिळत नाही. कारण टीव्हीवर नवीन चित्रपट महिना, दोन महिन्यात येणार, हे माहिती असल्याने प्रेक्षक घराबाहेर पडत नाही. त्यातच जो प्रेक्षकवगर आहे, तो मध्यम व सामान्य वर्गातील आहे. त्यामुळे ३०-४० हजार रूपये पगार असलेल्या व्यक्तीला महिन्यातून एकदा जरी कुटुंबासमवेत चित्रपट बघायला चित्रपटगृहात जायचे म्हटले तरी चार जणांसाठी दीड हजारांपर्यंत खर्च येतो. अशा स्थितीत जर महिन्याला चार-पाच चित्रपट प्रदर्शित होणार असतील, तर साहजिकच एखाद्याच चित्रपटाला न्याय मिळतो. त्यातच सैराटला यश मिळाल्यापासून थोडा पैसा मिळालेला व्यक्ती चित्रपट काढण्याच्या मागे लागतो. मात्र चित्रपट काढणे वाटते तितके सोपे नाही. तसेच ‘मार्केटिंग’अभावी अनेक चित्रपट लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत, अशी खंतही व्यक्त केली.विक्रम गोखले आदर्शमराठी चित्रपटसृष्टीतील आदर्श कोण? या प्रश्नावर जुवेकर म्हणाले की, विक्रम गोखले, मकरंद राजाध्यक्ष हे त्यांच्यासाठी आदर्श असल्याचे सांगितले. नाम फाऊंडेशनतर्फे मराठी चित्रपट कलावंतांनी कार्य सुरू केले आहे. त्याबाबत विचारणा केली असता जुवेकर म्हणाले की, यात सर्वाधिक श्रेय अरविंद जगताप यांना जाते. त्यांचीच ही मूळ संकल्पना. मात्र कलावंत जोडले गेले तर लोकांचा अधिक प्रतिसाद मिळतो. त्यामुळे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांना त्यांनी या कामात जोडले. नाना व मकरंद ही मोठी नावे आहेत. त्यांनीही तेवढीच मोठी भूमिका यात पार पाडली आहे.रंगभूमीचा अनुभव महत्वाचातुम्ही नाटक, सिरीयल्स व चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. कोणता अनुभव चांगला वाटला? या प्रश्नावर जुवेकर म्हणाले की, तिन्ही माध्यमे वेगळी आहेत. मात्र रंगभूमीवर काम केलेला कलावंत हा तावून-सलाखून निघालेल्या सोन्यासारखा असतो. रंगभूमीवर ‘लाईव्ह परफॉर्मन्स’ असतो. प्रेक्षकांची दादही लगेच समजते. टीव्ही, सिनेमाचे तसे नाही, त्यातच सिरीयलमधील कलावंतांना तर त्या पात्राच्या नावानेच ओळखले जाते. सिरीयल संपली की वर्षभरात लोक विसरून जातात. त्यापेक्षा चित्रपटातील भूमिका मात्र लोकांच्या कायम स्मरणात राहतात.
चांगल्या मालिका येण्यासाठी प्रेक्षकांनीच आवड बदलावी - संतोष जुवेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 5:45 PM
बहुतांश टीव्ही मालिकांमध्ये वास्तवता नाही
ठळक मुद्देवेबसिरीजमुळे अनेक चाहते मिळालेगरजेपेक्षा जास्त निर्मितीमुळे मराठी चित्रपट प्रेक्षकांविनारंगभूमीचा अनुभव महत्वाचा