लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा तिढा अजून काही महिने न सुटण्याचा स्थितीत आला आहे. मनपा प्रशासनाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा विषय कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठीच्या दिलेल्या प्रस्तावाला मनपातील सत्ताधाऱ्यांनी पुन्हा ‘ब्रेक’ लावला आहे. अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असून, या महासभेत याबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, गाळेधारक संघटनेकडून देण्यात आलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपाच्या महासभेचे आयोजन दि.२६ रोजी केले आहे. या महासभेत ३० विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. याच महासभेनंतर गाळेधारकांचा विषय मार्गी काढण्यासाठी विशेष महासभेचे नियोजन करण्यात येणार होते. तसेच गाळेधारकांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीचा मनपा प्रशासनाने तयार केलेला प्रस्ताव या विशेष महासभेत ठेवण्यात येणार होता. याबाबत मनपा प्रशासनाने गाळेधारकांबाबतच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव प्रशासनाने महापौरांकडे ठेवला असून, या महासभेत हा प्रस्ताव सादर न करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा गाळेधारकांचा तिढा या महासभेत तरी सुटू शकणार नसल्याचेच दिसून येत आहे.
पक्षाने घेतला निर्णय
मुदत संपलेल्या मार्केटपैकी अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील इतर मनपामधील गाळेधारकांबाबत निर्णय होत नाही तोवर शहरातील गाळेधारकांबाबतदेखील धोरणात्मक निर्णय घेण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतली होती. तसेच महासभेत प्रस्ताव आल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतरदेखील प्रशासनाने प्रस्ताव तयार करून, तो महापौरांकडे सादर केला. मात्र, सत्ताधारी भाजप नेतृत्वाकडून हा विषय थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या महासभेत गाळेधारकांचा विषय पुन्हा प्रलंबित ठेवण्यात आला आहे.