लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपातील भाजप नगरसेवकांमधील अंतर्गत वाद सर्वश्रुत असून, आता थेट महापौरांच्या दालनातच भाजपचे नगरसेवक व नगरसेविका पती निधीच्या कामावरून एकमेकांना भिडले आहेत. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील व याच प्रभागातील नगरसेविका प्रतिभा पाटील यांचे पती सुधीर पाटील यांच्यात नव्याने मंजूर झालेल्या निधीतून होणाऱ्या कामांवरून चांगलाच वाद झाल्याची माहिती भाजपच्याच विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत प्रभाग क्रमांक ८ मधील नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी विविध कामांसाठी ३ कोटी ५४ लाख रुपयांचा डीपीडीसीतून मंजूर करून आणलेल्या निधीचा प्रस्ताव ठेवला होता. महासभेने मंजुरी दिल्यानंतर या निधीतून होणाऱ्या रस्ते व गटारीच्या कामांसाठी लवकर निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. या निधीतून काही कामे शिवसेना नगरसेवक मनोज चौधरी यांना देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित निधीतील कामे मिळण्यावरून डॉ.चंद्रशेखर पाटील व सुधीर पाटील यांच्यात महापौरांच्या दालनात वाद झाला. यावेळी मनपातील काही नगरसेवकदेखील उपस्थित होते. वादाला सुरुवात झाल्यानंतर याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही नगरसेवक आक्रमक झाल्याने तोडगा निघू शकला नाही. दोन्ही ही नगरसेवकांनी एकमेकांचे उणे-दुणे काढत, महापौरांच्या दालनात नगरसेवक व मनपा कर्मचाऱ्यांसमोरच हा वाद केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
याआधीही वाद झाल्याचे उघड
मनपातील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आपल्या प्रभागातील कामांसाठी नाही तर आपल्याच पक्षातील नगरसेवकांच्या वादात प्रसिध्द होत आहे. याआधीही भाजप नगरसेवकांमध्ये वाद झाल्याचे उघड झाले आहे. गेल्या आठवड्यातच भाजप गटनेते भगत बालाणी व महिला, बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांचे पती भरत कोळी यांच्यात भाजप कार्यालयातच वाद झाला होता. याआधीही नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांचाही एका मक्तेदाराशी महापौरांच्या दालनात हाणामारी झाली होती. आता पुन्हा एकाच प्रभागातील नगरसेवक आमने-सामने आले आहेत.
कोट..
निधी मिळाल्यानंतर प्रभागातील विकासकामांबाबत किरकोळ वाद झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून हा निधी मिळविण्यासाठी मी पाठपुरावा केला होता. तसेच या निधीतून संपूर्ण प्रभागातीलच कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.
-डॉ.चंद्रशेखर पाटील, नगरसेवक
भाजपच्या कोणत्या नगरसेवकांचा वाद झाला याबाबत मला कोणतीही माहिती नाही. महापौरांच्या दालनातदेखील कोणताही वाद झाला नसल्याची ही माहिती घेतली आहे.
-कैलास सोनवणे, नगरसेवक
आमच्या प्रभागात जी कामे मंजूर झाली आहेत. ती कामे सर्व प्रभागात करण्यात यावी, अशी आमची मागणी होती. एकाच भागापुरता हा निधी खर्च होऊ नये, अशी आमची मागणी होती. यामध्ये कोणताही वाद आमच्यात झालेला नाही.
-सुधीर पाटील, नगरसेविका पती