भुसावळ (जळगाव) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाजनादेश यात्रेदरम्यान जळगाव दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महाजनादेश यात्रेला लोकांचं समर्थन मिळत आहे. सरकारने केलेल्या कामांमुळेच लोकांचा पाठिंबा मिळत आहे. यापुढेही शेतकरी, पाणी, दुष्काळ, बेरोजगारी यासंदर्भातील कामे सरकारकडून प्राध्यान्याने सोडविण्यात येत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, देशाची अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे आलेल्या मंदीच्या परिस्थितीवरही मुख्यमंत्र्यांनी मौन सोडले.
देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. बँकांना 70 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणे असेल, अतिरिक्त संसाधनातून बँकांना 5 लाख कोटी रुपये देऊन त्यातून मोठ्या प्रमाणात इक्विटीडी आणण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे उद्योगांना आणि व्यापाराला मोठा फायदा मिळेल. व्याजाचे दर रेपोरेटशी जोडण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. रिझर्व्ह बँक रेपो रेट कमी करते. तरीही, बँकांकडून व्याजाचा दर कमी करण्यात येत नाही. गेल्या 9 वर्षातील सर्वात कमी रेपो रेट आज रिझर्व्ह बँकेने केलाय. ऑटोमोबाईल सेक्टरसाठी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. आता, ऑटोमोबाईल श्रेत्रात मंदीऐवजी तेजी येताना दिसेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. कन्झ्युमर सेक्टरमध्ये मोठा बदल दिसेल, असे म्हणत देशातील मंदीच्या स्थितीबाबत फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.
मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली. भुसावळमधील स्थानिक मुद्द्यांपासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यापर्यंतच्या विषयांना स्पर्श केला. तसेच, विरोधकांवर हल्लाबोल करताना, नेहमीप्रमाणे मोदींचं कौतुकही मुख्यमंत्र्यानी केले. तसेच, विधानसभा निवडणुकांमध्येही महायुतील मोठं यश मिळेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांना राज्यात ठेवायचे का? केंद्रात पाठवायचे? यासंदर्भातील निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.