हवामान बदलाचा परिणाम : रब्बीवर परिणाम होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
- हिवाळ्याचा कालावधी
नोव्हेंबर ते मार्च
- पाच महिन्यांतील किमान तापमानाची सरासरी
१४ अंश
- यंदाची किमान तापमानाची सरासरी
१७ अंश
गेल्या दहा वर्षांतील हिवाळ्यातील किमान तापमानाची सरासरी
२०११ -१२ - १२ अंश
२०१२ -१३ - १३ अंश
२०१३ -१४ - १४ अंश
२०१४ -१५ - १५ अंश
२०१५ -१६ - १४ अंश
२०१६ -१७ - १३ अंश
२०१७ -१८ - १४ अंश
२०१८ - १९ - १३ अंश
२०१९ - २० - १६ अंश
२०२० - २१ - १७ अंश
जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असून, त्याचा परिणाम तीनही ऋतूंवर पडलेला दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. तर उन्हाळ्यातील तापमानात वाढ होऊन उन्हाळा जूनपर्यंत लांबला आहे. तर हिवाळ्यातदेखील आता थंडीच्या प्रमाणात घट होत असून, गेल्या दहा वर्षांत हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ ते ४ अंशाची वाढ झाली आहे. थंडीचे प्रमाण कमी होऊन पावसाळ्याच्या सरासरीत वाढ व तापमानातदेखील वाढ होत आहे.
काय परिणाम होईल
बदलत्या हवामानामुळे गेल्या दोन वर्षांचा विचार केल्यास रब्बीचा हंगाम नेहमी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत घेतला जात होता. तो हंगाम आता डिसेंबर ते एप्रिलपर्यंत लांबत आहे. तसेच थंडीचे प्रमाण कमी झाल्यास रब्बीतील गहू, हरभऱ्याचा पिकांवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. गहूची वाढ खुंटेल व उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाचा हंगाम लांबत असल्याने उडीद व मूग या पिकांचे दरवर्षी नुकसान होऊन हे पीक पाण्यातच जाण्याची शक्यता आहे.
तापमानात वाढ होण्याचे कारण
हवामान बदलामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. यंदा अरबी समुद्रात अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने, पाऊस चांगला झाला. मात्र, आता ला लिनाचा प्रभाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेकडून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून बाष्पयुक्त वारे अरबी व हिंदी महासागरात दाखल होत आहेत. या वाऱ्यांना लॅटिन भाषेत ला लिना असे संबोधले जाते. आधीच समुद्राच्या पाण्याच्या तापमानात वाढ होत असल्याने चक्रीवादळांची स्थिती निर्माण होत असल्याने, दुसरीकडे बाष्पयुक्त वाऱ्यांचा मिलाप होत असल्याने यंदा हिवाळ्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार डिसेंबर व जानेवारी महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच फेब्रुवारी व मार्च महिन्यातदेखील गारपीट व अवकाळी पावसाची शक्यता आहे.
कोट..
शेतकऱ्यांनी बियाणांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पावसाळ्यात मूग, उडीदचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी मूगची लागवड करण्याची गरज आहे. यासह हवमान बदलामुळे तापमानात होणारी वाढ लक्षात घेता शेतकऱ्यांनी बांधावर वृक्षांची लागवड करण्याची गरज आहे. हवामान बदलामुळे पारंपरिक शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
- समाधान रतन पाटील, कृषी तज्ज्ञ,
हवामानात दिवसेंदिवस बदल होत आहेत. समुद्रावरील तापमानात वाढ होत आहे. यामुळे सातत्याने चक्रीवादळं तयार होत आहेत. यामुळे हिवाळ्यातही अवकाळी पावसाची स्थिती आता कायमच राहण्याची शक्यता आहे. या वादळांमुळे उत्तरेकडील थंड वारे अडविले जात आहेत. यामुळे थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. हवामान कोरडे राहिले तर थंडीचा कडाकादेखील वाढू शकतो.
- नीलेश गोरे, हवामान तज्ज्ञ, संचालक, वेलनेस वेदर