लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीसुध्दा काही नागरिक रस्त्यांवर विनाकारण वावरताना आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना रोखायचा असेल तर विनाकारण बाहेर फिरणे टाळा, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले.
शहरात पावसाळ्यापूर्वीच्या रस्त्यांच्या दुरुस्ती, मार्केटमधील स्वच्छता व नालासफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधताना दिली. कोरोनाची दुसरी लाट सुरू असून नागरिकांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. अनेक जण विनाकारण शहरात वावरत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलीसदेखील रस्त्यावर उतरून नागरिकांना सतर्क करीत आहेत. त्यामुळे शहरात विनाकारण वावरणे नागरिकांनी थांबवावे, असेही आवाहन त्यांनी केले.
लसीकरण केंद्र वाढविणार
१८ वर्षे वयोगटावरील व्यक्तींच्या लसीकरणाला १ मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शहरात लसीकरण केंद्र वाढविण्यात येणार आहेत, अशी माहिती महाजन यांनी दिली. तसेच लक्षणे जाणवताच, तत्काळ ॲन्टिजेन तपासणी करावी, असेही आवाहन त्यांनी केले.