लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सध्या संचारबंदीत दुकाने उघडण्यास मनाई असतानाही शनिवारी मनपा अतिक्रमण विभागाने केलेल्या पाहणीत नवी पेठ, पोलन पेठ यांसह इतर भागात विविध प्रकारचे व्यावसायिक चोरून-लपून व्यवसाय करताना आढळून आले. मनपा अतिक्रमण विभागाने सील ठोकले असून, दुसरीकडे सुभाष चौकातूनही भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या एकूण पाच हातगाड्या जप्त केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात मनपा अतिक्रमण विभागाने चोरून-लपून व्यावसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांची दुकाने सील केल्यानंतर, शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने, सकाळपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली. यात कापडे विक्रेत्यांचे तीन दुकाने, इलेक्ट्रॉनिक साहित्याचे दोन दुकाने व प्रत्येकी एक मोबाइल, किराणा दुकान व इतर जनरल साहित्य विक्रीच्या एका दुकानाचा समावेश आहे. दरम्यान, ही कारवाई करते वेळी यातील काही व्यावसायिकांनी मनपाच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला, तसेच सुभाष चौकातही भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या हातगाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही कारवाई करताना हे व्यावसायिक बिनधास्तपणे दुकानात ग्राहक शिरवून व त्यानंतर बाहेरून शटर बंद करून व्यवसाय करत होते, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन करताना दिसून आले नसल्याचेही मनपातर्फे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
भाजीपाला विक्रेत्यांच्याही हातगाड्या जप्त
यावेळी मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना शहरातील सुभाष चौक, टॉवर चौक, फुले मार्केट या भागात काही भाजीपाला विक्रेते रस्त्यावर गाड्या लावून व्यवसाय करताना आढळून आले. मनपा अतिक्रमण विभागाचे या विक्रेत्यांच्याही हातगाड्या जप्त केल्या आहेत.