लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील यावल प्रादेशिक वनक्षेत्रातील मनुदेवी क्षेत्र जैवविविधतेने समृद्ध असून, या क्षेत्रात विविध जातींचे प्राणी, पशुपक्षी, वनसंपदा असून, या क्षेत्राला राखीव संवर्धन वनक्षेत्राचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा आहे. या संदर्भात राज्य वन्यजीव कृती आराखडा समितीकडे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांच्याकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव राज्य वन्यजीव कृती आराखडा समितीचे सदस्य राजेंद्र नन्नवरे यांच्या मार्फत राज्यस्तरीय समितीला सादरही करण्यात आला आहे.
वन्यजीवांच्या बाबतीत विविधता
खान्देशात जळगाव जिल्ह्यात अत्यंत समृद्ध असे वनक्षेत्र आहे. यावल प्रादेशिक आणि यावल वन्यजीव अशा दोन भागांत यावल वनविभाग आच्छादित आहे. येथे प्रामुख्याने सागवानांचे दाट शुष्क वनप्रदेश असून, काही भागात अंजन, धावडा, सालयी, करंज सारखे वृक्षही आहे. यावल प्रादेशिक वनक्षेत्र वन्यजीव अधिवासाने समृद्ध आहे.
यावल अभयारण्य आणि मुक्ताई भवानी टायगर रिझर्व्ह, तसेच अनेर धरण अभयारण्य जोडून असल्याने यावल प्रादेशिक वनक्षेत्रात वन्यजीवांच्या बाबतीत विविधता आढळून येते.
२५० पेक्षा जास्त प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी
गेल्या १२ वर्षांत वन्यजीव संरक्षण समितीच्या वतीने या प्रदेशात विविध वन्य प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. यात मांसाहारी प्राणी बिबट्या, रान मांजर (जंगल कॅट), लांडगा, खोकड कोल्हा, रानकुत्रे, तसेच अस्वलाचे अस्तित्वही मोठ्या प्रमाणात आहे. नीलगाय, भेकर, चौशिंगा, ससे, रान डुक्कर, उदमांजर, छोटी मांजर, साळींदरही आढळतात. तीन वर्षांपूर्वी जगातील सर्वात लहान आकाराचे पिसोरी हरीण (माऊस डीयर)ही मनुदेवी वनक्षेत्रात नोंदविले आहे. त्याचबरोबर रान कोंबडे, वन पिंगळा, मत्स्य घुबड, कृष्ण गरुड, राज्य फुलपाखरू राणी पाकोळी (ब्लू मॉर्मन)ही नोंदविले आहे. या भागात २५० पेक्षा जास्त प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी आढळून येतात. २० प्रजातींचे ऑर्किड वनस्पती, अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती, वृक्ष, कीटक, फुलपाखरू, जलचर यांचा मोठ्या संख्येने अधिवास आहे.
शाकाहारी, मांसाहारी सस्तन प्राण्यांच्या नोंदी
गेल्या तीन वर्षांत यावल प्रादेशिक वनविभागाच्या परवानगीने संशोधक पथकाने वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या अभ्यास गटाने यावल प्रादेशिकचे तत्कालीन उपवनसंरक्षक संजयकुमार दहिवले आणि यावल वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या नेतृत्वाखाली या प्रदेशात सर्वेक्षण केले असून, सद्यस्थितीत नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. संस्थेचे अभ्यासक राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे, गौरव शिंदे, बाळकृष्ण देवरे, रवींद्र फालक, अमन गुजर, अभिषेक ठाकूर, चेतन भावसार, कल्पेश तायडे, रवींद्र सोनवणे यांनी जलचर, सरीसृप, कीटक, पक्षी, वनस्पती, वृक्ष, तसेच शाकाहारी, मांसाहारी सस्तन प्राण्यांच्या महत्त्वपूर्ण नोंदी घेतल्या आहेत.
वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास
यावल अभयारण्यात वाघाचे अस्तित्व असून, मनुदेवी यावल प्रादेशिक, वागझिरा, आंबापाणी, मुंजोबापासून देवझिरीपर्यंत वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून आल्या आहेत. यावल अभयारण्याच्या गाभा क्षेत्र व्यतिरिक्त यावल प्रादेशिक भागातही वाघ, बिबट, अस्वल, तडस, रान कुत्रे, कोल्हे, लांडगे यांचे अस्तित्व आणि संचार असून, अभयारण्य आणि प्रादेशिक वनक्षेत्रात येत्या काळात वन्यजीवांना अधिक संरक्षण प्राप्त होण्यासाठी मनुदेवी वनक्षेत्रास संवर्धन राखीवचा दर्जा मिळाल्यास येत्या वर्षात वाघ नक्कीच वाढतील, असा विश्वास वन्यप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. मनुदेवी, वागझिरा ते यावल अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील मंडपाला असा प्रदेश वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास म्हणून ओळखला जातो.
भर उन्हाळ्यात पाणवठे भरलेले
मनुदेवीपासून ५ किलोमीटर पश्चिमेस १२व्या शतकातील गवळीवाड्याचे अवशेष बघायला मिळतात. पूर्वेस साठवण तलाव असून, उत्तरेस वागझिरा धरण आहे. वागझिरापासून यावल अभ्यारण्यात संचारासाठी भ्रमण मार्ग असून, सात घोल या नावाने नदी सदृश्य नाला प्रसिद्ध आहे. या नाल्यात किमान १० महिने पाणी असते, तर मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही अनेक भागांत लहान मोठे पाणवठे भरलेले असतात.
या परिसरात बिबट, अस्वल, रान मांजर, खवले मांजर सोबतच सरीसृप प्रजातीतील भारतीय अंडीखाऊ सर्प, भारतीय अजगर, विषारी फुरसे, घोणस, चापडा, सारखे सर्प आणि झाड चिचुंद्री,उडती खार असे अनेक दुर्मीळ वन्यजीवांचा अधिवास आहे. यावल प्रादेशिक वनक्षेत्रातील मनुदेवी, वागझिरा वनक्षेत्र मनुदेवी काॅझर्व्हेशन रिझर्व्ह झाल्यास या भागातील जैविक विविधतेस अधिक संरक्षण प्राप्त होईल.
------------------_-
मनुदेवी वनक्षेत्रात अनेक दुर्मीळ प्राण्यांचा, तसेच वनस्पतींचा अधिवास आहे. पिसोरी, रानकुत्रे, खवले मांजर, झाड चिचुंद्रीसारखे अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. हे आम्ही करत असलेल्या अभ्यासात नोंदविले असून, मनुदेवी राखीव क्षेत्र म्हणून घोषित करावे.
- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था
यावल प्रादेशिक पश्चिम वनक्षेत्रात समृद्ध जैविक विविधता आढळून येते. या भागाला अधिक सुरक्षा देण्याची गरज आहे. यावल प्रादेशिक वनक्षेत्रातील मनुदेवी, वागझिरा वनक्षेत्र राखीव क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यास, या भागातील जैविक विविधतेस अधिक संरक्षण प्राप्त होईल.
- रवींद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक तथा अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था
वन्यजीव संरक्षण संस्थेच्या अभ्यासातून गेल्या १३ वर्षांत यावल पश्चिम वनक्षेत्रात कंदील पुष्प, दुर्मीळ आमरीसारख्या वनस्पती, पतंग, ड्रॅगन फ्लाय आणि फुलपाखरांच्या अनेक प्रजाती, दुर्मीळ वृक्षसंपदा, भारतीय अंडीखाऊ सर्प, भारतीय अजगर, सहसा पश्चिम घाटात आढळणारा चापडा सर्प, पाली आणि सरडे, बेडूक, मासे अशी विपुल जैविक विविधता अधोरेखित झाली आहे. आता याला अधिक संरक्षण मिळावे.
- राहुल सोनवणे, अभ्यासक वन्यजीव संरक्षण संस्था
फोटो कॅप्शन (फोटो मेलवर टाकले आहे)
मनुदेवी वनक्षेत्रात आढळणारा अस्वल, उडती खार, तसेच बाराव्या शतकातील गायवाडा किल्ल्याचे अवशेष.