जिल्हा परिषदेकडे भूसंपादनाचा निधी वर्ग
जळगाव : जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वी पाझर तलावांसाठी काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या होत्या. भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना देण्याकरिता जिल्हा परिषदेने ९ कोटी २९ लाख रुपये खर्च केले होते. जिल्हा नियोजन विभागाने जिल्हा परिषदेला हा निधी नुकताच वर्ग केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांनी दिली.
बुधवारी आढळले तीन पॉझिटिव्ह प्रवासी
जळगाव : रेल्वे स्टेशनवर चार दिवसांपासून अँटीजन चाचणी करण्यात येत असून, बुधवारी तीन प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ११ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, ३१० प्रवाशांच्या हातावर शिक्के मारून त्यांना विलगीकरणात पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
शिवाजीनगरकडील तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वे प्रशासनातर्फे शिवाजीनगरकडील तिकीट खिडकी बंद करण्यात आली आहे. यामुळे शिवाजीनगरकडून येणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने शिवाजीनगरकडील तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
अमृतच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था
जळगाव : केळकर मार्केट व तहसील कार्यालय परिसरात गेल्या आठवड्यात अमृतच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ता खोदण्यात आला. मात्र, काम झाल्यानंतर रस्त्याची व्यवस्थित दुरुस्ती न केल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने तातडीने हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.