मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये नगराध्यक्षांच्या घरासमोरीलच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वरणगाव रोड ते असताना घरी या रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात येऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांना शुक्रवारी देण्यात आले.शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, बाळा भालशंकर, संतोष माळी, दीपक खुळे, मुकेश डवले, पवन सोनवणे, नीलेश ढवले, निखिल राणे यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरोत्थान निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक सहामधील भुसावळ रोड ते असता नगरीपर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम केवळ चार महिने आधी केले आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे रस्त्याचे तीन-तेरा झाले आहेत. रस्त्यावरील काँक्रीट उडालेले असून, खडी उखडायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे हा रस्ता नगराध्यक्षांच्या घरासमोरील असूनही या रस्त्याची परिस्थिती खराब आहे तर शहरातील इतर रस्त्यांची परिस्थिती काय असेल, असा प्रश्न निर्माण होत आहे. तरी या रस्त्याचे गुणांक करणारी एजन्सी, पालिकेचे बांधकाम अभियंता व मक्तेदार या सर्व संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या कामाची तत्काळ चौकशी करून संबंधितांना रस्ता दुरुस्त करण्याचे सांगण्यात येईल. मक्तेदाराचे बिल निघालेले असले तरी रस्ता दुरुस्तीसाठी भाग पाडण्यात येईल.-अश्विनी गायकवाड, मुख्याधिकारी, नगर परिषद, मुक्ताईनगर
मुक्ताईनगर नगराध्यक्षांच्या घरासमोरीलच रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 3:53 PM
प्रभाग क्रमांक सहामध्ये नगराध्यक्षांच्या घरासमोरीलच रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
ठळक मुद्देमुक्ताईनगर येथे शिवसेनेची तक्रारतातडीने दखल घेण्याची मागणी