जळगाव : बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला देण्याचा कार्यक्रम ऐतिहासिक आणि भावस्पर्शी असून बहिणाबाईंच्या शब्दातली जादू, गोडी आणि अन्वयार्थ वेगळाच होता. संसाराचे चित्र त्यांना ज्ञात होते. सामाजिक जीवनात स्त्रीयांना स्थान नसताना अशा काळात त्यांच्या साहित्यातून समाजाचे सूक्ष्म निरीक्षण प्रकट होते. भाषेला अत्युच्च शिखरावर नेताना जीवनाचे तत्वज्ञान त्यांनी अत्यंत साध्यासोप्या भाषेत मांडले. जगात इतक्या सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान कोणीच मांडले नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी नामविस्तार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा लाभक्षेत्र विकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए. टी. पाटील, रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार स्मिता वाघ, चंदूलाल पटेल, एकनाथराव खडसे, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, किशोर पाटील, उन्मेश पाटील, डॉ. सतीश पाटील, चंद्रकांत सोनवणे, शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नात स्नुषा पद्माबाई चौधरी, विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे आदी उपस्थित होते.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन करण्यात येणाऱ्या बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्रासाठी आवश्यक निधी आणि पदे मंजूर करण्यात येतील. तसेच विद्यापीठ परिसरात २०० विद्यार्थ्यांचे वसतिगृह उभारण्यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीचे कौतुक करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आवश्यक पाठबळ शासनातर्फे देण्यात येईल. नंदुरबार येथील आदिवासी अकादमीसाठी राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाच वर्षांत २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, यापैकी प्रतीवर्षी अडीच कोटी रुपये शासन व अडीच कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येतील, विद्यापीठामध्ये नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात येईल, विद्यापीठाचा परिसर ग्रीन कॅम्पस म्हणून ओळखला जावा यासाठी सौर ऊर्जा प्रणालीकरीता आवश्यक सहकार्य करण्यात येईल, गिरणा नदीतील वाहून जाणारे पुराचे पाणी बंधारा घालून अडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री म्हणाले, विद्यापीठे ही ज्ञानकेंद्रे होणे आवश्यक आहे. ज्ञानवान तरुणाईच्या माध्यमातून देशाचे भाग्य बदलू शकते. तरुणांचे शिक्षण आणि विचार यावर देशाची दिशा ठरते. असा ज्ञानवान तरुण घडविताना विद्यापीठांनी संशोधनावर विशेष भर देणे आवश्यक आहे. देशाला विद्यापीठाची वैभवशाली परंपरा आहे. तक्षशिला, नालंदासारख्या विद्यापीठाच्या माध्यमातून ज्ञानाचा वारसा जगभर पोहोचला. परकीय आक्रमकांनी आपले ज्ञान नष्ट केले. नंतरच्या काळात लोकांच्या माध्यमातून ते जगासमोर आले. बहिणाबाईंनी असेच प्रत्येक कालखंडासाठी उपयुक्त असलेल साहित्य निर्माण केले आहे.जगात नाविन्यतेवर भर देण्यात येत आहे. जगातील संचार क्रांतीचे प्रणेते भारतीय तरुण आहेत. या तरुणांच्या बळावर भारत विश्वगुरू होऊ शकतो. भारताला जगावर राज्य करायचे नसून जगाला मार्गदर्शन करायचे आहे आणि तसे करण्याची क्षमता भारतीय तरुणाईत आहे. मात्र, ज्ञानसंपादन करताना युवकांनी शिक्षणाचा उपयोग समाज परिवर्तनासाठी करावा, बहिणाबाईंनी जी संवेदना साहित्यातून निर्माण केली ती जपावी, असे आवाहन त्यांनी केले.बहिणाबाईंच्या साहित्यात विज्ञानाचे मूल्य सामावले होते. त्यांनी माय म्हणता म्हणता ओठाला ओठ भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर पडे, जीजी म्हणता म्हणता झाला जीभले निवारा, सासू म्हणता म्हणता हळूच गेला तोंडातून वारा या चार वाक्यात फोनेटिक्सचे शास्त्रशुद्ध तंत्र मांडले आहे. सामान्य माणसाचे दु:ख सर्वजण पाहतात, मात्र व्यक्त करण्याची ताकद ज्याच्या शब्दात असते त्यांचे साहित्य चिरकाल टिकतं. बहिणाबाईंच्या साहित्यातून अशा मानवी संवेदना प्रकट होतात. बहिणाबाईच्या साहित्याने जी उंची गाठली ती विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रातील कामगिरीने गाठावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.अहिराणी भाषेतून भाषणाला सुरूवातमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिराणी भाषेतून भाषणाला सुरूवात करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली. ‘उघडा नागडासले कपडा देनारी कपाशी, उपाशीले अन्न देणारी केळी आनी भटकेल माणूसले साधा शब्दमा मार्ग देखाडणारी बहिणाबाईनी कविता दुनियाले देणाºया खान्देशनी पवित्र मातीले वंदन’ अशा शब्दात त्यांनी खान्देशचा महिमा वर्णन केला. पर्यटनमंत्री रावल यांनीदेखील ‘बहिणाईनं अहिराणीनं नाव करं’ अशा शब्दात अहिराणी भाषेच्या प्रसारात बहिणाबाईंचे योगदान त्यांच्या भाषेत मांडले.रावल म्हणाले, खानदेशवासीयांनी पाहिलेल्या स्वप्नाची आज पूर्ती झाली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आंतरराष्ट्रीयस्तरावर आपला ठसा उमटविला आहे. खान्देश परिसरात अनेक पर्यटनस्थळे असल्याने विद्यापीठात ट्रॅव्हल टुरिझम अभ्यसासक्रम सुरू करण्यात यावा आणि अहिराणी भाषा व संस्कृती जपण्याचे कार्य व्हावे. आदिवासी भागातील तरुणांच्या विकासासाठी विद्यापीठाद्वारे अधिकाधीक कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या नंदुरबार येथील आदिवासी अकादमीस जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आणि साहित्यातून जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळते. त्यांनी अहिराणी भाषेला वैभव मिळवून दिले, अशा शब्दात रावल यांनी बहिणाबाईंच्या सहित्याचा गौरव केला.कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले.यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यापीठाच्या नामविस्तारानिमित्त तयार केलेल्या ‘उत्तमविद्या’ या गृहपत्रिकेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, विद्यापीठाचे पदाधिकारी, अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहिणाबाई चौधरी यांनी साध्यासोप्या भाषेत मांडले जीवनाचे तत्वज्ञान - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 8:07 PM
कवयित्री बहिणाबाई चौधरी नामविस्तार
ठळक मुद्देजळगावात विद्यापीठ परिसरामध्ये २०० विद्यार्थ्यांचे वसतिगृह उभारण्यासाठी सहकार्य करणारनंदुरबार येथील आदिवासी अकादमीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी