अमळनेर, जि.जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्यानिमित्ताने प्रताप महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे व्यक्तित्व आणि काव्य’ या विषयावर जळगाव येथील डॉ.जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.सत्यजीत साळवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थिर्नींकडून बहिणाबाईंच्या निवडक कवितांचे अभिवाचन व गायन करण्यात आले. यात तनया चौधरी हिने (मी कोन?), भाग्यश्री कासार (विठ्ठल मंदिर), दर्शना ठाकूर (संसार), मीनल पाटील (मन), महानंदा पाटील (धरत्रीले दंडवत), जयश्री पाटील (खोप्यामधी खोपा), मानसी भावसार (मानूस), सोनाली बाविस्कर (लपे करमाची रेखा) अशा विविधांगी कवितांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.दुसऱ्या सत्रात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्याख्याते प्रा.सत्यजीत साळवे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या व्यक्तिमत्वावर व त्यांच्या काव्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, ‘बहिणाबाईंची कविता ही साध्या-सोप्या भाषेतून मानवी जीवनाचे तत्वज्ञान मांडते. बहिणाबाईंच्या ‘बहिणाबाईची गाणी’ या पुस्तकातून पानोपानी चिंतन प्रकटले आहे. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, अफाट प्रतिभाशक्ती, वास्तव दर्शन, शिवाय ग्रामीण आणि कृषि जीवनाचे प्रत्ययकारी दर्शन ती आपल्या बोलीतून जिवंत करते.म्हणून तिची कविता लोकमुखी झाली आहे, असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एल.एल.मोमाया होते. सोबत मराठी विभागप्रमुख प्रा.एम.बी.निकम, प्रा.आर.पी.पाटील, प्रा.संदीप नेरकर, प्रा.नितीन पाटील, प्रा.नीलेश चित्ते, प्रा.धनंजय चौधरी, प्रा.ज्ञानेश्वर मराठे, प्रा.किरण भागवत आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगेश पाटील, प्रास्ताविक ज्ञानेश्वर कांबळे, पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. रमेश माने, तर आभार प्रा.विलास गावीत यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
बहिणाबाईंचे काव्य म्हणजे चिंतनशीलतेचा ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 8:38 PM