लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : श्रीरामपूर येथील अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यातील संशयीत माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांचेसह पाच जणाचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी जळगाव येथील न्यायाधीश सी.व्ही.पाटील यांनी फेटाळला. अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असलेल्या एका संशयितास यातून वगळण्यात आले.
सरकार पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील मोहन देशपांडे यांनी बाजू मांडली. पिडीतेकडून अकील ईस्माइल यांनी बाजू मांडली.
माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांचेसह सहा जणांविरुद्ध पीडितेच्या इच्छेविरुद्ध लग्न लावणे, विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा पोस्को अंतर्गत जामनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी व सिल्लोड येथील सुनील कोचर यांचा संशयीतात समावेश आहे.
इच्छेविरुद्ध लग्न लावले
फिर्यादी मुलीचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध सावत्र वडिलांनी लावल्याचे तक्रारीत म्हटले असून अल्पवयीन असल्याने आईचाही लग्नाला विरोध होता. मात्र या विरोधाला न जुमानता लग्न लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लग्नानंतर सासू व पतीकडून छळ झाल्याचे व चुलत सासऱ्याकडून विनयभंग झाल्याचा उल्लेख आहे.