मुंबई - शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाची कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यातच, आगामी पोटनिवडणुकीच्या अंतर्गत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण ते तात्पुरत्या निर्णयाने गोठवलं आहे. उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला आत मशाल घेऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. तर, शिंदे गटालाही नवीन चिन्ह लवकरच मिळणार आहे. तर, उद्धव ठाकरेंनाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं असून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निश्चित झालं आहे. त्यावरुन, माजी मंत्री सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. तसेच, बाळासाहेबांची शिवसेना ही संघाची असल्याचा योग जुळून येत असल्याचंही ते म्हणाले.
शिवसेनेच्या दोन्ही गटांना त्यांनी मागितल्याप्रमाणे चिन्ह मिळू शकले नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह मिळालं असून त्यांच्या शिवसेनेचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं राहणार आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांना अधिकृत चिन्ह मिळालेले नाही. मात्र, त्यांच्या शिवसेनेचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे राहणार आहे. एकंदरीतच शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून महाराष्ट्रातल राजकारण ढवळून निघाल आहे. त्यातच गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
संघाची स्थापना बाळासाहेबांनी केली
शिंदे गटाला बाळासाहेब यांची शिवसेना अस नाव मिळालं. दुसरीकडे संघाची स्थापना बाळासाहेब देवरस यांनी केली आहे. त्यामुळे, बाळासाहेब या नावाचा योगायोग या ठिकाणी जुळून आला आहे. त्यामुळे बाळासाहेबांची सेना ही संघाची सेना असा अर्थ या ठिकाणी योगायोगाने निघतो, असे मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केले. धनुष्यबाण हे चिन्ह जनमानसात पूर्णपणे रुजल होतं, आता जे नवीन चिन्ह मिळाले आहे, ते रुजवण्यासाठी मोठे परिश्रम दोन्ही गटाला करावे लागतील. मात्र, दुसरीकडे संघटना ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली असल्यामुळे त्यांना प्रचाराला सोपं जाणार असल्याचेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले . पावसाच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळावी
परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालं आहे. तर, कापूस पिकावर लाल्या नावाचा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, संकटात असलेल्या शेतकऱ्याला आधीच्या नुकसानीतील अद्यापही पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही, असे म्हणत खडसे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. आता, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचेही लवकरात लवकर पंचनामे करावे, अधिकाधिक मदत शेतकऱ्याला मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी सरकारकडून व्यक्त केली.